नाशिक : यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर व समाधानकारक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी, नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यामध्ये जेमतेम पाणी शिल्लक राहिल्याने हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मान्सून बरसला नाही तर गंभीर संकट निर्माण होण्याची भीती प्रशासनाला वाटू लागली आहे.
नाशिक जिल्ह्यात मोठी धरणे सात, तर मध्यम धरणांची संख्या १७ असल्याने पाणी साठवणुकीच्या एकूण २४ प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षी सरासरी १०२ टक्के पाऊस झाल्याने आॅक्टोबर अखेर ९२ टक्के पाणीसाठा झाला होता, त्यामुळे पाणीटंचाईचे सावट दूर झाले. धरणांच्या पाण्यावर विविध प्रकारचे आरक्षण असल्याने डिसेंबरपासून आवर्तने सुरू करण्यात आली, त्यात विशेष करून नाशिक जिल्ह्यातून मराठवाडा, जळगाव, नगर जिल्ह्यासाठी पाणी सोडण्यात आले. धरणांतील शिल्लक पाणी जुलै अखेर पिण्यासाठी राखून ठेवण्यात आले मात्र मार्च महिन्यांपासून उन्हाचा तडाखा वाढल्याने धरणांच्या पाण्याची पातळी झपाट्याने खालावली शिवाय सिंचन व बिगर सिंचनासाठी वेळोवेळी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने धरणातील पाण्याचा वापरही वाढला. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी बारा टक्के इतकाच साठा शिल्लक आहे. त्यातही नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २३ टक्के इतका समाधानकारक साठा असला तरी, अन्य अकरा धरणांनी तळ गाठला. अन्य धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा पाहता जेमतेम १२ टक्के पाणी सध्या शिल्लक असून, पाण्याची मागणी व उपलब्ध साठ्याचा विचार करता पाऊस वेळेवर बरसण्याची प्रतीक्षा आहे.यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याचा दावा हवामान खात्याने केला असून, गत वर्षीच्या तुलनेत तो सरासरी बरसणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात ३ जून रोजी सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावून आशादायी चित्र निर्माण केले असले तरी, मृग नक्षत्राचे आगमन होऊन तीन दिवसांचा कालावधी उलटूनही पावसाची हजेरी लागलेली नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावांमध्ये ७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टॅँकर भरण्यासाठी वापरले जाणारे पाण्याचे स्त्रोतही आटू लागले आहेत.
प्रमुख धरणांमध्ये शिल्लक पाणीगंगापूर-१६, पालखेड-१४, करंजवण-६, ओझरखेड-१४, दारणा-३, नांदूरमध्यमेश्वर-३७, चणकापूर-२७, गिरणा-२५, पुनद-२० टक्के इतके पाणी शिल्लक आहे. आळंदी, वाघाड, पुणेगाव, तिसगाव, भावली, मुकणे, वालदेवी, भोजापूर, नाग्यासाक्या, माणिकपुंज ही धरणे कोरडीठाक पडली आहेत.