नांदगाव : रंगपंचमी खेळताना तरुणांनी रंगांनी भरलेले ओले कपडे विजेच्या तारांवर फेकून हुल्लडबाजी केली त्यात एक तार तुटून मोठी होळी भागातली वीज गायब झाली होती.१४ दिवसांनी मिळालेले पाण्याचे आवर्तनही त्यामुळे मध्येच थांबवावे लागले. या प्रकाराविषयी वीज कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून तारांवरील कपडे काढण्यासाठी मदत मागितली; मात्र त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही. हुल्लडबाजी करणारे तरुण पुढे आले नाही. शेवटी पाच तासांनंतर नगरपालिकेतून शिडी आणून कपडे काढल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.गेल्या वर्षी पाणीटंचाईमुळे शहरात रंगपंचमी साजरी झाली नाही. या पार्श्वभूमीवर यंदा तरुणाईमध्ये उत्साह होता. मात्र काहींच्या अतिउत्साहाचे रुपांतर हुल्लडबाजीत झाले. रस्त्यांवर कर्णकर्कश आवाजात डीजे, ढोल-ताशे वाजवून तरु णाई थिरकली. अंगविक्षेप करून नाचता नाचता, उत्साहाच्या उन्मादात एकाने अंगातला बनियन काढून तारेवर फेकला. बघता बघता इतरांनीही त्याचे अनुकरण केले आणि तारांवर रंगीत ओल्या कपड्यांची रांग लागली. तारांवर कपडे फेकून नाच करणे यात जणू स्पर्धा सुरू झाली. यामुळे वीजवाहक तार तुटून होळी चौकातील वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. उत्सव काळात पोलिसांची गस्त झाली तर असा प्रकार टाळता येऊ शकला असता असे नागरिकांचे म्हणणे आहे. वीज वितरणचे प्रमोद जाधव, मनोहर जाधव, रवींद्र सोनवणे यांनी तारांवरील कपडे काढून वीजपुरवठा सुरळीत केला. (वार्ताहर)
तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे ग्रामस्थ नाराज
By admin | Updated: March 18, 2017 23:36 IST