नाशिक : संस्कृत ही माहिती तंत्रज्ञानात उपयुक्त भाषा आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रणाली तयार करताना पाणिनी व्याकरणातील सूत्रांचा वापर केला जातो. देशभर यावर संशोधन सुरू आहे. जगातील तज्ज्ञांनी पाणिनीच्या सूत्रांचे महत्त्व मान्य केले आहे, असे प्रतिपादन भाषा तज्ज्ञ डॉ. अंबा कुलकर्णी यांनी केले. एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्स महाविद्यालयातील मराठी व संस्कृत विभागातर्फे ‘भाषिक कौशल्ये आणि रोजगार संधी’ या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी होते. यावेळी डॉ. कुलकर्णी म्हणाल्या की, भाषा कशी काम करते हे समजण्यासाठी भाषेशी संबंधित माहिती व तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अनुवादाच्या क्षेत्रातही संगणकाचा मोठा उपयोग होऊ लागल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात माध्यमतज्ज्ञ संजीव लाटकर यांनी ‘प्रसार माध्यमांचे बदलते स्वरूप’ याबाबत माहिती दिली. भाषेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, हे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. डॉ. जयश्री पाटणकर यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा. अनंत येवलेकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांनी विशेष प्रयत्न केले.
माहिती तंत्रज्ञानात व्याकरणाचा वापर
By admin | Updated: August 21, 2015 23:57 IST