ना शिक : प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीचे आमिष दाखवून चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड येथील एका बेरोजगाराला सुमारे साडेदहा लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भामट्यांच्या टोळीने यासाठी नाशिकच्या आदिवासी विकास विभागाचे बनावट संकेतस्थळ व अपर आयुक्त हुद्द्याचे बनावट शिक्के व स्वाक्षरीचाही वापर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी विकास विभागाच्या हुबेहूब दिसणाऱ्या बनावट बोधचिन्हाचा वापर करत संकेतस्थळ विकसित केले. यावरून नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना फसवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या भामट्यांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी संदीप कौतिक पाटील (२६) यास नोकरीचे आमिष दाखवून सतरा लाखांची मागणी केली. पाटील याच्या वडिलांकडून वेळोवेळी पैसे घेत एकूण साडेदहा लाख रुपये उकळले व उरलेल्या साडेसहा लाख रुपयांसाठी भामट्यांनी अपर आयुक्त हुद्द्याच्या बनावट शिक्क्याचा वापर व स्वाक्षरी करत फिर्यादीला नोकरीचे शासकीय नियुक्तिपत्रही दिले. कट रचून खोटे सही, शिक्क्यानिशी नियुक्तिपत्र दिल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील याने संशयित आरोपी सचिन परदेशी याच्याकडे नियुक्तिपत्र खोटे असून, फसवणूक केल्याचे सांगत दिलेल्या पैशांची मागणी केली असता सर्व संशयितांनी त्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आदिवासी विकास विभागात प्राथमिक शिक्षक नोकरभरती सुरू आहे, अशी जाहिरात बनावट संकेतस्थळावरून प्रसिद्ध करून बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या एकूण नऊ संशयितांची टोळी असून, त्यापैकी तिघांना अटक क रण्यात आली आहे. हे तिघे संशयित जळगाव व धुळे येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि.७) साडेदहा वाजता या तिघांना अटक केली आहे. पोलिसांकडून सदर गुन्ह्णाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.तिघांच्या आवळल्या मुसक्यापोलिसांनी शनिवारी हेमंत सीताराम पाटील (३१), सुरेश गोकुळ पाटील (३४, दोघेही रा. धुळे), तुकाराम रामसिंग पवार (५६, रा. जळगाव) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मात्र सचिन परदेशी, पप्पू ऊर्फ सुरेश पाटील, भालेराव, अमित लोखंडे, पठाण, आधार बाविस्कर, केतन पाटील, तुकाराम पवार हे अद्याप फरार असून, गुन्हे शोध पथक त्यांचा शोध घेत आहेत.
बेरोजगार युवकाला साडेदहा लाखांना गंडा
By admin | Updated: January 9, 2017 01:58 IST