मनमाड : लखनौ एक्स्प्रेसमधून पडून येवला येथील दोन तरुण व्यापाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री समीट रेल्वेस्थानकाजवळ घडली. मनमाड लोहमार्ग पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी एकाच वेळी दोघांचा मृत्यू झाल्याने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मृतांच्या नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.येवला येथील रंगोली क्लॉथ स्टोअर्सचे रुपेश रवींद्र हाबडे (वय २३) व मिरचीचे व्यापारी सिद्धेश चंद्रकांत माईनकर (वय २६) हे शनिवारी सकाळी पंचवटी एक्स्प्रेसने खरेदीसाठी मुंबई येथे गेले होते. खरेदी आटोपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी कल्याण रेल्वेस्थानकावरून मुंबई-लखनौ सुपरफास्ट एक्स्प्रेसने मनमाडला येत असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना भ्रमणध्वनीवरून सांगितले. रात्री साडेआठ वाजेनंतर नातेवाइकांनी प्रयत्न करूनही त्यांचा संपर्क झाला नाही. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत दोघेही घरी न आल्याने त्यांचे कुटुंबीय मनमाड रेल्वेस्थानकावर आले. त्यानंतरही मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांमधून सिद्धेश व रुपेश न आल्याने त्यांनी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधला. या गाडीने येतील.. त्या गाडीने येतील.. असे पहाटे चार वाजेपर्यंत रेल्वे स्टेशनवर वाट पाहत असलेल्या नातेवाइकांना समीट रेल्वेस्थानकाजवळ त्यांचे मृतदेह आढळून आले असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. एकाच वेळी दोघांचा मृत्यू झाल्याने अनेक शंका-कुशंका व्यक्त करण्यात येत आहेत. सदरची घटना हा अपघात नसून घातपात असावा, असा संशय नातेवाइकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही मृतदेहांचे मनमाड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.मृतांच्या नातेवाइकांनी जिल्हा उपरुग्णालयात गर्दी केली होती. रुपेश हाबडे हे कापड उद्योगातील यशस्वी व्यावसायिक म्हणून परिचित होते. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे सर्वांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. सिद्धेश माईनकर हे व्यवसाय सांभाळून शिक्षण घेत होते. (वार्ताहर)
रेल्वेतून पडल्याने दोघे ठार
By admin | Updated: October 4, 2015 22:00 IST