वणी : विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नाचा आरोप असणाऱ्या शिक्षकाला आज नाशिक येथील न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली, तर जिल्हा परिषदेतर्फे या शिक्षकाला निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.दरम्यान, या शिक्षकाच्या निलंबनाचा प्रस्ताव दिंडोरीच्या गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे पाठविला असून, सोनजांब येथे सहा महिन्यांपूर्वी शाळेत गैरवर्तणुकीच्या कारणावरून निलंबनाचा प्रस्ताव या शिक्षकाविरोधात पाठवूनही त्याला पाठीशी घालण्यात आले होते. दिंडोरी तालुक्यातील बोरवण पाडा येथील जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षक योगेश भिकाजी बोईर याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याच्या तक्रारीवरून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. यापूर्वी त्याची झालेली बदली संबधितांनी रद्द करुन त्याला अभय देण्यात आले होते. त्यामुळे मनोधैर्य वाढलेल्या या शिक्षकाची मजल इथपर्यंत पोहचल्याचा सूर गावकऱ्यांमधून उमटतो आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे संबंधित शिक्षकाच्या निलंबनाबाबत पाठपुरावा करणार असल्याची माहिती राहुल रोकडे यांनी दिली. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या संशयित शिक्षकाच्या वर्तनाबाबत व त्याला पाठीशी घालणाऱ्यांविरोधात नाराजीचा सूर उमटतो आहे. (वार्ताहर)
दोन दिवसांची पोलीस कोठडी
By admin | Updated: July 30, 2016 00:13 IST