त्र्यंबकेश्वर : कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीसाठी दहा आखाड्यांच्या सुमारे साठ हजार साधू-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या शाही मिरवणूकीने त्र्यंबकेश्वरमधील स्थानिक नागरिकांसह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मिरवणूकीनिमित्त त्र्यंबकनगरीत भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.साधू आखाडे आपल्या नियोजित वेळेत पोहोचण्यासाठी मिरवणुकीने निघाले, मात्र पहिले शाहीस्नान जुना आखाड्याचे होते. कुशावर्तावर पोहचण्याची त्यांची वेळ सव्वाचारची होती. तत्पूर्वी अडीच वाजेच्या सुमारास द्वारकाशारदा पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी आम आदमीप्रमाणे कुंभस्नान उरकून घेतले. त्यांच्यासमवेत त्यांच्या शिष्य परिवारानेही स्नान केले.श्री पंच जुना तथा रमता पंच गुरुगादी आखाडा पिंपळद येथून आल्यानंतर अगदी वेळेवर कुशावर्तावर पोहचला. या आखाड्याचे साधू पूर्वी नीलपर्वत येथून निघत. यावर्षी मात्र त्यांनी आपल्या देवता, शस्त्र, ध्वज आदि आखाड्याच्या पिंपळद येथील मालकीच्या पर्वध्वजा उभारल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तावर येण्यासाठी निघाले. जुना आखाड्याबरोबर आवाहन, अग्नि यांचे शाहीस्नान उरकल्यानंतर श्री पंचायती निरंजनी आखाड्याची मिरवणूक आनंद आखाडा एकापाठोपाठ आली. निरंजनी आखाड्याचे श्री महंत तथा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरीजी महाराज, महंत रामानंद पुरी, आशिषगिरी, महंत रवींद्रपुरी, दिनेशगिरी, महंत प्रेमगिरी, डोंगरगिरी, राजेश्वर वन आदि महंत तर आनंद आखाड्याचे महंत धनराजगिरी श्री महंत कैलासपुरी, कालुगिरी, श्री महंत लक्ष्मण भारती, श्री महंत गणेशानंद सरस्वती, गिरिजानंद सरस्वती तसेच महामंडलेश्वर श्री महंत सोमेश्वरानंद, धर्माचार्य शिवानी दुर्गा आदि मिरवणुकीत सामील होते. निरंजनी व आनंदचे शाहीस्नान संपल्यानंतर लगेचच श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याची मिरवणूक आली. थेट प्रयागतीर्थी श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्याची मिरवणूक आली. प्रयागतीर्थापासून या आखाड्याच्या साधूंचे सकाळी सातच्या दरम्यान महानिर्वाणीचे आगमन झाले. त्यांच्या पाठोपाठ अटल आखाड्याचे साधू होते. तोपर्यंत गर्दीही थोडी ओसरली होती. आखाड्याची संख्या सीमित असल्याने पोलीसही बाजूला उभे राहिले. कारण या साधूंच्या शाहीस्नानांनतर नंतरचा काळ दीड ते दोन तास विश्रांतीचा असतो. याच काळात पूर्वी बैरागी आखाडे स्नान करीत. त्यानंतरच्या काळात ते नाशिकला गेल्यानंतर ती वेळ आजही राखीव आहे. विशेष म्हणजे ही वेळ पूर्ण राखीव असून, त्यात कोणीच स्नान करीत नाही. पण यावेळेस काही भाविकांना स्नानासाठी सोडण्यात आले. यावेळी महानिर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्वर विश्वात्मानंद सरस्वती, श्री महंत रमेश पुरीजी, शिवनारायणपुरी, शिवपुरी, काही महामंडलेश्वर आदिंचा समावेश होता, तर अटल आखाड्याचे सचिव महंत उदयगिरीजी महाराज, श्री महंत सनातन भारती, श्री महंत हरिगिरीजी, सतीशगिरीजी, ब्रह्मपुरीजी आदि साधूगण होते. या सातही आखाड्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात ३0 ते ४0 रथ दाखल झाले होते. असे सुमारे सात नागा संन्यासी आखाड्यांतील १५० पावेतो रथ होते. यावेळेस प्राण्यांना शाहीस्नानासमयी आणण्यात प्रशासनाने प्रतिबंध घातले होते. प्राणी आणले नाहीत. घोडे नव्हते फक्त सोन्या-चांदीच्या देवता आदि आणण्यात आल्या होत्या. शाहीस्नानात बँड पथके, १ ढाल पथके तशी जास्त नव्हती. शृंगारलेले रथ होते. मिरवणुकीतील रथ मधल्या रस्त्यावर महंत, महामंडलेश्वरांना उतरवून रिकामे रथ पुढे गेले. मिरवणुकीत श्री महंत रघुमुनी, श्री महंत महेश्वरदास, श्री महंत संतोषमुनी, कोठारी महंत प्रेमानंद, श्री महंत बिंदूजी महाराज आदि सामील होते. महामंडलेश्वर श्री गुरुशरणानंद रमणरेती मथुरा यांच्याकडे गर्दी होती.नवव्या नंबरवर श्री पंचायती उदासीन नया आखाडा मिरवणूक कुशावर्तावर आली. या मिरवणुकीचे रथ शाही प्रवेशासमयी अडथळेग्रस्त झाले होते. यावेळेस तसे काही झाले नाही. तेथील अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. या आखाड्याची साधूंची संख्या मोजकीच होती. यावेळी महंत जगतारमुनी, मुखिया महंत भगतराम, मुखिया महंत मंगलदास, आकाशमुनी, धुनीदास, त्रिवेणीदास, विचारदास, सुरजमुनी, बसन्तमुनी आदि महंत स्नानासमयी होते. श्री पंचायती निर्मल आखाड्याचे साधू २०० ते ४०० पर्यंत असून, कोणत्याही प्रकारची शांती भंग न होता मिरवणूक निघाली होती. यावेळी माजी अध्यक्ष तथा विद्यमान मुखिया महंत बलवंतसिंह, थानापती महंत राजिंदरसिंह आदि मिरवणुकीत सामील होते. (वार्ताहर)
जय भोलेच्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमली!
By admin | Updated: August 29, 2015 22:39 IST