नाशिक : पारंपरिक आदिवासी संगीतावर एका लयीत थिरकणारे पाय... ढोलकीसह लीलया घेतली जाणारी गिरकी... नाचता-नाचता केली जाणारी फेट्यांची करामत अशा एक ना अनेक पैलूंनी नटलेल्या आदिवासी नृत्यांच्या नुसत्या झलकेनेच नाशिककर रसिकांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडले. देशाच्या निरनिराळ्या प्रांतांतील आदिवासींच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही नृत्ये पाहून रसिकांना पुढच्या दोन दिवसांच्या पर्वणीची चुणूक तर दिसलीच; शिवाय त्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली.राष्ट्रीय नाट्य विद्यालय (नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा) व नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय आदिवासी लोककलेवर आधारित आदिरंग महोत्सवाचे शुक्रवारी सायंकाळी दिमाखदार समारंभात उद्घाटन झाले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात महोत्सवाचा पहिला दिवस देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कलावंतांनी आपल्या आकर्षक नृत्याने गाजवला. भगवान शंकराची प्रतिमा असलेला देव्हारा डोक्यावर नाचवत, पारंपरिक गुजराथी वेशभूषेतील आदिवासी महिला कलावंतांनी प्रारंभीच रसिकांच्या टाळ्या घेतल्या. पायाला घुंगरू बांधून थिरकणाऱ्या कलावंतांच्या पुढच्या चमूने थरारक कसरती करीत रसिकांना श्वास रोखायला लावले. एकापाठोपाठ एक या पद्धतीने सुमारे सव्वा तास सुरू असलेल्या या नृत्यांच्या ठेक्याला रसिकांच्या टाळ्या पडत होत्या. दरम्यान, उद्घाटन समारंभाला प्रख्यात अभिनेत्री हिमानी शिवपुरी, ‘एनएसडी’चे संचालक प्रा. वामन केंद्रे, उपाध्यक्ष अर्जुनदेव चारण, महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी नगारे वाजवून आगळ्या पद्धतीने महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी चारण म्हणाले की, आदिवासींची संस्कृती जवळून अभ्यासण्याची गरज आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने नाशकात छोटा भारतच अवतरला आहे. महापौर मुर्तडक यांनी आदिवासी परंपरेबद्दल गौरवोद्गार काढत नाशिककरांना महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. उपमहापौर बग्गा यांनी सदर महोत्सवासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. लइक हुसेन यांनी सूत्रसंचालन केले. ए. के. बरुआ यांनी आभार मानले.
आदिवासींचे संस्कृति दर्शन
By admin | Updated: July 30, 2016 00:38 IST