मालेगाव : मराठा क्रांती मोर्चास रिपाइंने पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही मागणी रामदास आठवले यांनी २० वर्षांपासून लावून धरलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत दुमत नाही, विरोध नाही किंबहुना त्याला पाठिंबाच आहे. परंतु अनु. जातीबाबतचा कायदा रद्द न करता अथवा त्यामध्ये बदल करु नये, अशी आमची एकमुखी मागणी आहे.या कायद्याअंतर्गत शिक्षा होण्याचे प्रमाण ५ टक्केसुद्धा नाही. कारण या कायद्याची अंमलबजावणी करताना पोलीसच योग्य रितीने गुन्हा दाखल करीत नाहीत, तपास योग्यपद्धतीने होत नाही. त्यामुळे शिक्षेचे प्रमाण ५ टक्केही नाही. यामागे पोलिसांवर राजकीय पुढाऱ्यांचा, मंत्र्यांचा दबाव असतो आणि त्यामुळे शिक्षेचे प्रमाण कमी असते. त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्यात बदल अथवा तो रद्द करता कामा नये, असे दीपक निकम यांनी कळविले आहे.मराठा मोर्चे निघत असताना त्याविरोधात प्रतिमोर्चे काढणे चुकीचेच आहे. लोकशाही देशात प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. मराठा समाजाचे मोर्चे हे दलितांच्या विरोधात नसून त्यांच्या हक्काच्या मागणीकरीता आहे. असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मोर्चास रिपाइंचा पाठिंबा
By admin | Updated: September 24, 2016 01:00 IST