मालेगाव / मालेगाव कॅम्प : केंद्र शासनाने केलेल्या नोटाबंदीच्या निषेधार्थ येथील शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने कॅम्प रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन छेडले, तर महिला काँग्रेसने अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थाळीनाद आंदोलन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रवींद्र सायंकर यांना निवेदन सादर करण्यात आले.केंद्र शासनाने चलनातून पाचशे व हजाराच्या नोटा वगळल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले आहेत. या निषेधार्थ शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील कॅम्प रस्त्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी शासनाच्या निर्णयावर कडक शब्दात टीका केली. यावेळी अरुण निंबा देवरे, अॅड. आर. के. बच्छाव, तालुकाध्यक्ष गुलाबराव चव्हाण यांची भाषणे झाली. आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विनोद चव्हाण, दिनेश ठाकरे, डॉ. जयंत पवार, सलीम रिझवी, किशोर इंगळे, इरफान खान, शेखर पगार, शंकर नागपुरे आदिंसह पदाधिकारी सहभागी झाले होते. दरम्यान, नोटाबंदीच्या निषेधार्थ महिला काँग्रेसच्या सचिव व माजी महापौर ताहेरा रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थाळीनाद आंदोलन केले. नायब तहसीलदार सायंकर यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात यास्मीन कलीम अहमद, अंजूम शेख युनूस, सुरय्या रफीक अहमद, सलमा जजरोद्दीन आदिंसह नगरसेवक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
राकॉँचा रास्ता रोको
By admin | Updated: January 10, 2017 00:54 IST