अझहर शेख ,नाशिकनिमाणी-आडगाव नाका रस्त्यावरील अपघात प्रवण क्षेत्र बनलेल्या ‘सेवाकुंज’ चौकात बसविण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेला अखेर सहा वर्षांनंतर मुहूर्त मिळणार आहे. गेल्या बुधवारी (दि.७) सकाळच्या सुमारास रोनित या शाळकरी मुलाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने अवघे शहर हळहळले होते. या घटनेनंतर ‘सेवाकुंज’ चौकाच्या असुरक्षिततेबाबत महापालिकेपासून तर पोलीस प्रशासनाबरोबरच शाळा व्यवस्थापनावरही चौफेर टीकेची झोड उठली. चौक सुरक्षित करण्यासाठी धूळखात पडलेली सिग्नल यंत्रणेवरील ‘धूळ’ संबंधित प्रशासनाच्या वतीने शनिवारी (दि.१०) झटकण्यात आली.निमाणी ते जुना आडगाव नाका (काट्या मारुती चौक) हा रस्ता अत्यंत अरुंद असून, त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. या रस्त्यावर रुग्णालये, शाळा, रिक्षाथांबे, बस्थानक, बस आगार, मंदिर असे रहदारीचे क्षेत्र असल्याने रस्त्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या रस्त्यावर निमाणी स्थानकापासून ते थेट काट्या मारुती चौकापर्यंत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तसेच अपघातांवर कोणता तोडगा काढता येईल, याबाबत शासकीय यंत्रणेसमोर संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे पोलीस आयुक्तांनी अवजड वाहतूक दुसऱ्या पर्यायी मार्गाने वळविणे शक्य असल्याचे सांगितले आहे. तसेच अपघातानंतर या चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती वाहतूक शाखेकडून करण्यात आली आहे. निमाणी बसस्थानकासमोर दुभाजकाच्या प्रारंभी असलेला ‘कट’ यापूर्वी वाहतुकीसाठी बंद होता. सिंहस्थ पर्वणीकाळातही हा ‘कट’ बंद करण्यात आला होता; मात्र त्यानंतर येथून पुन्हा वाहतुकीला वळणाचा पर्याय खुला करून देण्यात आला आहे. यामुळे स्थानकासमोर वाहतूक कोंडीच्या समस्येला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे हा ‘कट’ पूर्णपणे बंदिस्त करणे शक्य व सोयिस्कर आहे का, याबाबतही विचार सुरू असल्याचे पोलीस उपआयुक्त विजय पाटील यांनी सांगितले.चौकाचे नूतनीकरण गरजेचे सेवाकुंज चौक ाची दुरवस्था झाली आहे. हा चौक अरुंद असल्यामुळे येथे वाहतुकीचा बोजवारा उडतो. त्याचप्रमाणे चौकात बसविण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकची दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी असलेले चेंबरचे लोखंडी रिंग वरती निघाले आहेत, तर कोठे पेव्हर ब्लॉक उखडून खड्डे पडले आहेत. यामुळे अनेकदा येथून मार्गक्रमण करताना चेंबरचे खड्डे वाचविताना वाहनचालकांना अपघातांचा सामना करावा लागतो. या संपूर्ण चौकात पेव्हर ब्लॉक काढून पुन्हा डांबरीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ना झेब्रा पट्टे, ना रेडियमसेवाकुंज चौक ातून मुख्य रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. अनेकदा येथून मार्गक्रमण करताना नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकतो. शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड, महात्मानगर यांसारख्या भागांमधील चौकांप्रमाणे या चौकात कुठलेही झेब्रा पट्टे, रेडियम ठोकळे, स्टॉप लाइन, असे काहीही बघावयास मिळत नाही. यामुळे येथून वाहनचालक कुठलीही तमा न बाळगता वाहने दामटविण्याचा प्रयत्न करतात आणि अपघाताच्या घटनांना निमंत्रण मिळते.गतिरोधकांचा अभावसेवाकुंज चौक ातून श्रीराम विद्यालय व पंचवटी एज्युकेशनच्या आरपी, कपाडिया, ए. व्ही. पटेल या सर्व शाळांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चौकाच्या प्रारंभी गतिरोधक बसविणे गरजेचे आहे. कारण या रस्त्यावरून सेवाकुंज चौकात दाखल होणारे दुचाकीस्वार, तसेच शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या वाहनांचा वेग अधिक असतो. त्यामुळे या मुख्य रस्त्यावरही गतिरोधक टाकणे गरजेचे असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले आहे. हा मुख्य रस्ता सेवाकुंज चौकाला येऊन मिळतो; मात्र वाहतुकीच्या नियमानुसार या ठिकाणी कुठलेही पांढरे पट्टे अथवा मार्गदर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. पाच हजार विद्यार्थ्यांची वर्दळसेवाकुंज चौक ातून श्रीराम विद्यालय व पंचवटी एज्युकेशनच्या आरपी, कपाडिया, ए. व्ही. पटेल या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता एकूण पाच ते साडेपाच हजार विद्यार्थ्यांची सेवाकुं ज चौकातून वर्दळ सुरू असते. आरपी विद्यालयाच्या आवारात इंग्रजी, गुजराथी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळांपासून, तर माध्यमिक शाळांपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. एकूणच लहान वयोगटापासून तर सोळा ते अठरा वयोगटांपर्यंत विद्यार्थी पंचवटी एज्युकेशनच्या आवारात शिक्षणासाठी हजेरी लावतात. या सर्व विद्यार्थ्यांची रहदारी असते ती सेवाकुंज चौकातूनच. यामुळे या चौकात कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती असणे ही काळाची गरज आहे.
‘सेवाकुंज’ सिग्नलला सहा वर्षांनंतर मुहूर्त...
By admin | Updated: October 10, 2015 22:52 IST