सतीश डोंगरे, नाशिकपासबुक भरण्यासाठी बॅँकेत तासन्तास रांगेत उभे राहणारे खातेदार सर्व व्यवहार घरबसल्या करीत आहेत. वीजबिल भरण्यापासून ते मोबाइलचे रिचार्ज करण्यापर्यंतचे सगळे व्यवहार चुटकीनिशी इंटरनेट बॅँकिंगद्वारे होत आहेत. मात्र या व्यवहारात जेवढी सहजता आहे, तेवढेच धोकेही असल्याने क्षणार्धात लाखो रुपयांची अफरातफर करणे सहज शक्य असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. २०१४ या वर्षात राज्यभरात इंटरनेट बॅँकिंगद्वारे फसवणुकीचे तब्बल १८४३ गुन्हे दाखल झाले असून, बहुतेक प्रकरणात खातेदारांचे अज्ञानच कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले आहे. इंटरनेटवर हॅकर्सचा धुमाकूळ लक्षात घेता, सुरक्षेच्या दृष्टीने बहुतांश बॅँकांनी आवश्यक तेवढ्या उपाययोजना केल्या आहेत. राष्ट्रीयीकृत बॅँका तर याबाबत अधिकच खबरदारी घेतात. शिवाय आपल्या खातेदारांना वेळोवेळी एसएमएस तसेच ई-मेलच्या माध्यमातून सतर्क करीत असतात. मात्र तरीदेखील खातेदार हॅकर्सला बळी पडत असल्याने, नेहमीच खातेदारांचे अज्ञान अन् बॅँकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केला जातो. दरम्यान, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोने सादर केलेल्या अहवालात २०१० पासून इंटरनेट बॅँकिंगद्वारे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, दरवर्षी अशाप्रकारच्या घटनांमध्ये भरच पडत असल्याचे स्पष्ट केले आहे. फसवणुकीच्या घटनांचा वाढता आकडा लक्षात घेऊन बॅँकांनीदेखील सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा उपाययोजना केल्या आहेत, अजूनही नव-नवीन व अद्ययावत सॉफ्टवेअर खातेदारांच्या दिमतीला विकसित केले जात आहेत. मात्र खातेदारांचा हलगर्जीपणा किंवा अज्ञानामुळे हॅकर्स त्यांना सहज शिकार करीत आहेत. २०१० मध्ये ११०३, २०११ मध्ये ११९६, २०१२ मध्ये १६२३, २०१३ मध्ये १५९५, तर २०१४ मध्ये हा आकडा १८४३ वर गेला आहे. यामध्ये पासवर्ड हॅक करणे, बॅँकेत रजिस्टर असलेल्या मोबाइल क्रमांकाचे डुप्लिकेट सीमकार्ड बनवून नेट बॅँकिंगचा पासवर्ड हॅक करणे, एटीएम पीन हॅक करून पैशांची अफरातफर करणे, क्रेडिट कार्डचा पासवर्ड हॅक करून परस्पर किंवा इतर देशांत खरेदी करणे अशा स्वरूपाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील बऱ्याचशा घटनांमध्ये हॅकर्सकडून आलेल्या फेक कॉलला खातेदारांनीच खात्यासंबंधातील संपूर्ण माहिती दिल्याची बाबही समोर आली आहे.
साधइंटरनेट बॅँकिंगच्या सुरक्षिततेला खिंडार
By admin | Updated: December 5, 2015 23:38 IST