नाशिक : नाशिककर धूलिवंदनला रंग खेळत नाही तर होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीच्या निमित्ताने रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटतात. नाशिककरांच्या रहाड रंगोत्सवाच्या परंपरेला सुमारे तीनशे वर्षांचा इतिहास आहे. नाशिकमध्ये सध्या चार पेशवेकालीन रहाडी आहेत. या रहाडींमध्ये नाशिककर रंगपंचमीला रंगात न्हाऊन निघतात. शहरातील तीन रहाडी खुल्या करण्यात येऊन रंगपंचमीसाठी सज्ज करण्यात आल्या आहेत.नाशिक शहरात रंगपंचमी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या रंगोत्सवाचे वेगळेपण आहे ते म्हणजे रहाडीचे. पेशवेकालीन खोदलेल्या रहाडी नाशिककरांनी अजूनही जपून ठेवल्या आहेत. शहरातील जुने नाशिक गावठाण भागात या रहाडी भूमिगत आहेत. वर्षभर या रहाडींवरून रहादारी सुरू असते. रंगपंचमीच्या आदल्या दिवशी सकाळपासूनच या रहाडींच्या जागेवर विधिवत पूजन क रून रहाड खोदण्यास सुरुवात करण्यात आली होती. पंचवटीमधील शनि चौक, गोदाकाठावरील संत गाडगे महाराज पुलालगतचा दिल्ली दरवाजा परिसरात आणि जुन्या तांबट गल्लीमधील रहाडी रंगोत्सवासाठी सज्ज करण्यात आल्या आहेत. रंगपंचमीच्या पूर्वसंध्येलाच या रहाडी पूर्णपणे खुल्या करण्यात येऊन स्वच्छता करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
नाशिककरांनी जोपासला ‘रहाड’ रंगोत्सव
By admin | Updated: March 17, 2017 01:07 IST