नाशिक : गेल्या तीन-चार वर्षांपासून आर्थिक परिस्थितीशी झुंजणाऱ्या महापालिकेने उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना आखल्या असतानाच स्थायी समिती सभापती सलीम शेख यांनी शहरातील विविध कार्यालयांमध्ये मिनरल वॉटर अर्थात शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेमार्फत प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव प्रशासनापुढे ठेवला आहे. प्रशासनाने त्यास तत्त्वत: मान्यता दिली असून, लवकरच तो मान्यतेसाठी महासभेवर ठेवण्यात येणार असल्याची माहिती सलीम शेख यांनी दिली.शहरात मिनरल वॉटरच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर फसवणूक होण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. मिनरल वॉटर तयार करणाऱ्या कंपन्यांकडूनही जादा दर आकारत आर्थिक फसवणूक केली जाते शिवाय महापालिकेच्याच पाण्याचा सर्रास वापर केला जाऊन त्यामाध्यमातून बख्खळ कमाई केली जाते. मिनरल वॉटरचा २० लिटर्सचा एक जार बाजारपेठेत ६० रुपयांना विक्री केला जातो. त्यामुळे महापालिकेनेच मिनरल वॉटरचा प्रकल्प का उभारू नये अशी संकल्पना स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांना सुचली आणि त्यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह विद्यमान अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाने त्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यानुसार, प्रकल्पाचा प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवण्यात येणार आहे. सदर प्रकल्प खासगी संस्थेच्या माध्यमातून चालविला जाणार असून, त्यासाठी महापालिकेचा भूखंड उपलब्ध करून दिला जाणार आहे. सदर प्रकल्पासाठी महापालिका पाणी उपलब्ध करून देणार असून, त्यावर महापालिकेचेच नियंत्रण असणार आहे. महापालिकेच्या या प्रकल्पामार्फत शहरातील विविध शासकीय-निमशासकीय कार्यालये, खासगी संस्था यांना शुद्ध पाण्याचे जार उपलब्ध करून दिले जातील. त्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नही मिळू शकेल, असा प्रस्ताव आहे. (प्रतिनिधी)
उत्पन्नवाढीसाठी शुद्ध पेयजल प्रकल्प
By admin | Updated: October 22, 2016 01:33 IST