नाशिक : प्रभाग क्रमांक १३च्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर निकाल जाहीर झाला. यावेळी पराभूत उमेदवाराच्या सोमवार पेठेतील घरावर विजयी गटाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रभाग क्रमांक १३ मध्ये कॉँग्रेसचे दोन, मनसे, राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले. दरम्यान, एका राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या घरावर विजयी गटाच्या कार्यकर्त्यांकडून दुपारच्या सुमारास चाल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेप्रकरणी गणेश मोरे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत त्यांनी शेवाळे पंकज, शाहू खैरे, सागर खैरे, सुरेश पाटील, नीलेश खैरे (सर्व रा. खैरे गल्ली) यांच्याविरुध्द बळजबरीने घरात घुसून दगडफेक केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मोरे यांच्या वडिलांच्या पायाला दगड लागल्याने त्यांना दुखापत झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी गैरकायद्याने जमाव बोलविणे व दगडफेक करत कायदा सुव्यवस्था धोक्यात आणल्याप्रकरणी संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
पराभूत उमेदवाराच्या घरावर दगडफेक
By admin | Updated: February 24, 2017 01:16 IST