नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वी विजयाचे भले भले दावे करणाऱ्या पक्षाच्या स्थानिक प्रमुखांना त्यांच्या प्रभागातच दारुण पराभवाला सामोरे जावे लागले असून, यातून महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षदेखील सुटू शकले नाहीत. निवडणुकीतील जय-पराजयाचा विचार करता, पक्षनेत्यांचे सर्वच दावे फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळण्याचा दावा शिवसेनेने केला होता. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी बहुमतच नव्हे तर त्यापेक्षा अधिक म्हणजे ७२ जागा हमखास मिळतील, अशी छातीठोक ग्वाहीही दिली जात होती. त्यामुळेच की काय पक्षाच्या उमेदवारांमध्येदेखील उत्साह संचारून त्यांना आकाश ठेंगणे झाले होते. प्रत्यक्षात शिवसेनेला निम्म्या जागांवरच समाधान मानावे लागले. शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते हे स्वत: प्रभाग बारामध्ये निवडणूक रिंगणात उतरले होते. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी त्यांनी आपल्या पातळीवरच चौघांचे पॅनल करून उमेदवारही ठरवून घेतले व मिळेल त्या माध्यमातून प्रचारही केला होता. असे करताना एक राष्ट्रवादी व एक कॉँगे्रसी असलेल्यांना सेनेत प्रवेश देऊन पावन करून घेतले. पण मतदानाची आकडेवारी समोर येताच, बोरस्ते यांच्या प्रभागात ते स्वत:च कसे बसे निवडून येऊ शकले. त्यासाठी त्यांना बरीच झुंज द्यावी लागली व अन्य तिघांना जोरदार फटका बसला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या प्रभाग क्रमांक बारामध्ये चारही जागा कॉँग्रेसला सोडण्यात आल्या होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस आधी दोन्ही कॉँग्रेसने आघाडी केली व ठाकरे यांच्या मातोश्रीचा उमेदवारीसाठी दावा असतानाही त्यांना तो सोडून आघाडीसाठी माघार घ्यावी लागली. राष्ट्रवादी कॉँग्रेसला या निवडणुकीत बारा ते पंधरा जागांची अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत ठाकरे यांच्या प्रभागात कॉँग्रेसचे दोनच उमेदवार निवडून येऊ शकले व राष्ट्रवादीला सहाच जागा मिळाल्या आहेत. कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांचे निवासस्थान असलेल्या पंचवटीतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये कॉँग्रेसला एक जागा आघाडीने सोडली होती. विपुल मंडलिक असे नाव असलेल्या उमेदवाराला पक्षाने एबी फॉर्मही दिला व त्याने नामांकनही दाखल केले. परंतु निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच त्याने माघार घेत शहराध्यक्ष अहेर यांना घरचा ‘अहेर’ दिला. याच प्रभागात राष्ट्रवादीचे उमेदवारही आघाडीच्या वतीने उभे राहिले, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. अहेर यांना महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसला किमान पंधरा ते वीस जागांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यांना सहा जागांवरच समाधान मानावे लागले व त्यांच्या प्रभागात पक्ष खाते उघडू शकला नाही हे वास्तव आहे. मनसेचे महानगरप्रमुख राहुल ढिकले यांच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये मनसेने स्थानिक नगरसेवकांशी अघोषित आघाडी करून निवडणूक लढविली. ढिकले यांच्या प्रभागात मनसेचे दोन उमेदवार नशीब आजमावित होते. त्यापैकी एक जागा जिंकून पक्षाची इभ्रत राखली, मात्र अन्य पक्षीय दोघे अपक्ष निवडून आले. मनसेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. मनसेला या निवडणुकीत सत्ताप्राप्तीचे संख्याबळ अपेक्षित नसले तरी, गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांच्या बळावर किमान गत निवडणुकीत मिळालेल्या जागांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात हा पक्ष एकेरी आकड्यावरच अडकला. महापालिका निवडणुकीत बहुमत मिळविणाऱ्या भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्या प्रभागातही काही वेगळी परिस्थिती नव्हती. प्रभाग क्रमांक तीनमध्ये स्वत: सानप यांचा पुत्र मच्छिंद्र याच्यासह अन्य तीन उमेदवार भाजपाकडून उमेदवारी करीत असताना त्यातील तिघांचा विजय, तर भाजपाच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. सानप यांच्यासाठी खरा तर तो पराभवच मानला जातो. भाजपाला या निवडणुकीत बहुमत मिळण्याची खात्री असण्याची शक्यता तशी कमीच होती, कारण निवडणुकीच्या दिवसापर्यंत एकाही भाजपाच्या नेत्याने बहुमत मिळेल, असा दावा केला नव्हता.
नेत्यांच्या प्रभागातच पक्षाचा पराभव
By admin | Updated: February 25, 2017 23:55 IST