पंचायत राज समितीचा दौरा तसा म्हटला तर खूपच घाईगर्दीत जाहीर करण्यात आला. तयारीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचे कारण पुढे करून प्रशासनाने सुरुवातीला नाके मुरडली व हा दौरा पुढे ढकलावा म्हणून छुपे प्रयत्नही केले; परंतु बहुधा समितीलादेखील गेल्या वर्ष-दीड वर्षापासून आपल्या कामकाजाची चुणूक दाखविण्याची कोरोनामुळे संधी मिळाली नसल्याने समितीने दौरा रद्द वा पुढे ढकलण्यास नकार दिला. त्यामुळे प्रशासनाला (नाइलाजाने) तयारीत गुंतवून घ्यावे लागले. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषदेत लगीनघाईने कामकाज केले गेले. प्रशासकीय प्रलंबित प्रकरणांचा निपटारा असो वा समितीने पाठविलेल्या प्रश्नावलीचे स्पष्टीकरण, अशा सर्वच पातळीवर प्रशासनाने नैसर्गिक तयारी केली. त्याचबरोबर भौतिक तयारीतदेखील कुठेही ‘कमतरता’ भासणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत ‘चोख’ व्यवस्था ठेवली. समितीच्या दौऱ्याच्या निमित्ताने सण, उत्सवासारखी सजावट जिल्हा परिषदेत करण्यात आली. डागडुजी झाली, रंगरंगोटी करण्यात आली, भिंतीचे रंगलेले कोपरे आकर्षक फुलझाडांच्या कुंड्यांनी झाकण्यात आले. सर्वच साफसफाई, भंगार साहित्याचा निपटारा करण्यात आला. संपूर्ण जिल्हा परिषद लख्ख उजळली. सारे कर्मचारी, अधिकारी जातीने हजर, रजा, सुट्या, दांड्यांना अटकाव बसला. प्रशासकीय कामकाजालाही गती मिळाली. समितीच्या दौऱ्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आलेली उत्स्फूर्तता खरोखरीच वाखाणण्याजोगी आहे. समितीनेही त्याची योग्य ती दखल घेऊन निश्चितच समाधान व्यक्त केले असेल, यात शंकाच नाही; मात्र समितीच्या दौऱ्यानिमित्ताने अलर्ट मोडवर आलेले प्रशासन पुढच्या काळातही कायमच तत्पर ठेवण्यासाठी समितीने पाच वर्षांतून एकदा येण्यापेक्षा दरवर्षीच दौरा केला तर प्रशासकीय यंत्रणेलाही इतकी धावपळ करावी लागणार नाही आणि त्यांच्या कामकाजात कायमच गतिमानता राहील. फार फार तर यंत्रणेवर कामाचा अतिरिक्त ‘बोजा’ पडेल इतकेच.
- श्याम बागुल