मागील वर्षी राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून प्रशासनाने मंदिरे दर्शनासाठी बंद केल्याने चैत्रोत्सव यात्रा व निवृत्तीनाथांचा पायी दिंडी सोहळा रद्द केला होता. दरवर्षी चैत्रोत्सवासाठी खानदेशातील नंदुरबार, धुळे, जळगाव, पाचोरा, नाशिकसह अन्य राज्यांतून दहा लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतात. सलग दुसऱ्या वर्षी चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव खंडित झाल्याने येथील व्यावसायिकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.
भाविक आणि पर्यटक त्र्यंबक व सप्तशृंगगड येथील व्यावसायिकांचा मूळ कणा आहे. अनेक छोटे-मोठे व्यावसायिक व पुरोहित वर्ग याठिकाणी आहेत. अनेक कुटुंबियांचा उदरनिर्वाह हा देवस्थानावरच अवलंबून आहे. दोन महिन्यांपूर्वी मंदिरे खुली होऊन परिस्थिती पूर्वपदावर येत असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने सलग दुसऱ्या वर्षी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले,
तर भाविकवर्ग दर्शनापासून वंचित राहिला आहे.
किती दिवस कळसाचेच दर्शन
आम्ही दरवर्षी कुटुंबासह गडावर देवी दर्शनासाठी येत असतो; परंतु मागील वर्षी कोरोनाने थैमान घातल्याने दर्शनासाठी येऊ शकलो नाही. मुलाचे जावळ व देवीचे दर्शन होईल ही आशा घेऊन मी गडावर आलो; परंतु यावर्षीही देवीचे दर्शन न घेता माघारी फिरावे लागले. त्यामुळे प्रशासनाने निर्णय घेऊन मंदिर सुरू करावे.
- संतोष महाले, भाविक, कल्याण
दररोजच्या नियमाप्रमाणे सकाळी व सायंकाळी दर्शन करण्याची सवय असल्याने तीन वर्षांपासून चुकल्यासारखे वाटते. त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृह डोळे भरून पाहिले की दिवसभर ताजेतवाने वाटते. सर्वत्र मंदिर उघडले असले तरी महाराष्ट्रातील मंदिरे बंद आहेत. ती उघडली पाहिजेत.
- राहुल खत्री, भाविक, त्र्यंबकेश्वर
शहराचे अर्थकारण मंदिरावर अवलंबून
त्र्यंबकेश्वर मंदिर उघडले पाहिजे असे इतरांबरोबर मलाही वाटते. त्र्यंबकेश्वर शहराचे अर्थकारण मंदिर उघडण्यावर अवलंबून आहे. तीन महिने मंदिर बंद आहे. हे सर्व जरी खरे असले तरी आपण शासनाच्या निर्णयाविरुद्ध जाऊ शकत नाही. मागचा अनुभव पाहता कोरोनाची दुसरी लाट जबरदस्त होती. त्यापेक्षा शासन जेव्हा आदेश देईल तेव्हा मंदिर उघडेल.
- सत्यप्रिय शुक्ल, मध्यान्ह पुजक, त्र्यंबकेश्वर
आर्थिक गणित कोलमडले
भारतातील सर्व मंदिरे खुली केली आहेत; पण महाराष्ट्र सरकार मात्र मंदिर उघडण्याचे आदेश देत नाही. त्र्यंबकेश्वर शहराचे सर्वच अर्थचक्र मंदिर उघडण्यावर अवलंबून असल्याने लोक धंद्यावाचून बसले आहेत. गावात आज चार वाजेपर्यंत दुकाने उघडी असली तरी ग्राहकच नाही तर दुकान उघडून तरी काय करायचे, असा प्रश्न आहे. आता कोरोना शहरात नाही तरीही निदान विशिष्ट वेळेपर्यंत शासनाचे कोरोनासंबंधित नियमाचे पालन करून मंदिर उघडले पाहिजे.
- श्यामराव गंगापुत्र, व्यावसायिक, त्र्यंबकेश्वर
गेल्या वर्षीपासून गडावरील सर्वच व्यवसाय ठप्प आहेत. व्यवसायावर उपजीविका अवलंबून असल्यामुळे मागील वर्षीपासून दुकान बंद आहे. फक्त दोन महिने दुकान उघडले त्यामुळे पुन्हा मंदिर बंद झाल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला. बचत गट व बँकाही पैसे भरण्यासाठी तगादे लावत आहेत. दुकान बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने व्यावसायिकांचे हाल बघता मंदिर लवकरात लवकर सुरू करावे.
- महेश पाटील, व्यावसायिक, सप्तशृंगगड