येवला : राज्यातील नाशिक जिल्ह्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु दुष्काळी परिस्थिती व पाणी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णत: हटवून निर्यात पूर्णत: खुली करावी, अशी विनंती येवला बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे तसेच संचालक तथा शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतू पा. झांबरे यांनी एका निवेदनाद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषिमंत्री राधामोहन सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पणन व वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. सन २०१५ मध्ये शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करूनही अवकाळी पाऊस व गारपिटीने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे कांदा उत्पादनात घट झाली व कांद्याचे बाजारभाव जुलै, आॅगस्ट २०१५ मध्ये प्रमाणापेक्षा वाढले. त्यामुळे केंद्र शासनाने कांद्याचे किमान निर्यातमूल्य प्रतिटन १५० डॉलरवरून ७५० डॉलर केल्याने निर्यात पूर्णपणे बंद झाली. तसेच बाहेरील देशातून कांदा आयात केल्याने कांद्याचे बाजारभाव स्थिर राहिले.त्याकरिता बाहेरील देशातून करण्यात येणारी कांद्याची आयात बंद करून आपल्या देशातील कांदा बाहेरील देशात निर्यात करण्यासाठी कांद्याचे मूल्य पूर्णत: हटवून जास्तीत जास्त कांद्याची निर्यात होईल यासाठी प्रयत्न करावा. कांद्याचे निर्यातमूल्य कमी न केल्यास त्याचा फायदा पाकिस्तानसह इतर देशांतील शेतकऱ्यांना होईल. कांद्याचे निर्यातमूल्य पूर्णत: हटविल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्यास योग्य भाव मिळून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघेल, दोन पैसे त्यांच्या हातात पडतील व ग्राहकांनाही कांदा वाजवी दरात उपलब्ध होईल. यासाठी केंद्र शासनाने शेतकरी हितासाठी योग्य तो निर्णय घेण्याची आवश्यकता निवेदनात व्यक्त केली आहे. कारण सदरचा निर्णय शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णत: हटवून खुली करावी. हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
कांदा उत्पादक संकटात
By admin | Updated: November 2, 2015 23:34 IST