नाशिक : प्रभाग क्रमांक १४च्या मतमोजणीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी जुने नाशिक भागात दगडफेक करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुमारे पाच चारचाकी व सात ते आठ दुचाकींची तोडफोड संतप्त कार्यकर्त्यांनी केली. यावेळी दंगलनियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते.जुने नाशिक परिसरात दुपारी ३ वाजेच्या सुमारास बागवानपुरा, कथडा, कोकणीपुरा, चौकमंडई भागात राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे दोन गट आमनेसामने आल्याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी आपापसांमध्ये हाणामारी करत चौकमंडई, बागवानपुरा, आझाद चौक परिसरात दगडफेक करून रस्त्यांवर उभ्या असलेल्या दुचाकी-चारचाकी वाहनांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी दारे-खिडक्या बंद करून घेतली होती. सर्वत्र पळापळ सुरू झाल्याची माहिती मिळताच दंगलनियंत्रण पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, उपनिरीक्षक हनुमंत वारे आदिंनी समाजकंटकांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. धरपकड करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला; मात्र यावेळी सर्व समाजकंटकांनी हैदोस घालून भूमिगत झाले होते. यामुळे पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत संबंधितांचा शोध घेतला जात होता. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)
जुन्या नाशकात दगडफेक
By admin | Updated: February 24, 2017 01:09 IST