नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतील अंतर्गत दुफळी पुन्हा उफाळून आली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे घेतलेल्या बैठकीमध्ये नाशिकसंदर्भातील सर्व निर्णय शहर प्रभारी जयकुमार रावल हे घेतील असे स्पष्ट केले आहे.
नाशिक भाजपतील वाद नवीन नाही. आमदार आणि संघटनेतील वाद त्याचबरोबर महापालिकेवर पकड घेण्यासाठी असलेली स्पर्धा ही सर्वश्रुत
आहे. महापालिकेत सत्ता आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांचा महापालिकेवर पूर्ण ताबा होता तो कायम आहे.
दरम्यानच्या काळात काही महिन्यांपूर्वीच पक्षाने जयकुमार रावल यांची शहर प्रभारी म्हणून नियुक्ती केली, मात्र त्यानंतरही महापालिकेतील निर्णयावर सातत्याने माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचा प्रभाव असतो. स्थायी समिती सदस्य आणि सभापतिपदाच्या निवडणुकीत ते दिसून आले.
गेल्या ३१ मे रोजी सभागृह नेते आणि गटनेते बदलावरूनदेखील अशाच प्रकारचा संघर्ष उफाळून आला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आदेश देऊनही पदाधिकारी राजीनामे देण्यास तयार नव्हते, त्यामुळे वाद वाढला होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा यांच्या अंतिम आदेशामुळे सभागृह नेता आणि गटनेता यांना राजीनामा देणे भाग पडले आणि कमलेश बोडके यांची सभागृह नेता तर अरुण पवार यांची गटनेतापदी नियुक्ती करण्यात आली. त्यावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नाशिकला येऊन बैठक घेणार होते. मात्र त्यावेळी शक्य न झाल्याने शनिवारी (दि.१९) पुणे येथे नाशिकमधील पदाधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. माजी मंत्री जयकुमार रावल, महापौर सतीश कुलकर्णी आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे, लक्ष्मण सावजी, विजय साने, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह अन्य पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. नाशिक शहराचे प्रभारी म्हणून माजी मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सूत्रे सुपुर्द करण्यात आली आहेत, त्यामुळे यापुढे त्यांचा निर्णय अंतिम असेल असे स्पष्ट करण्यात आल्यामुळे गिरीश महाजन यांच्यापेक्षा रावल यांचा शब्द नाशिकमध्ये अंतिम असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे पक्षाने डॅमेज कंट्रोल सुरू केले असले तरी थांबेल यावर हे लवकरच स्पष्ट होईल.
इन्फो
महापालिकेत स्थायी समितीची सत्ता राखण्यासाठी गणेश गिते यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी पक्षातील गटबाजी टाळण्यासाठी माजी महापौर रंजना भानसी आणि स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आडके यांना समितीत सदस्य म्हणून संधी देण्यात आली, मात्र निवडणुका संपल्यानंतरही हे सदस्य बदलले नसून, त्यावरदेखील बैठकीत चर्चा करण्यात आली. या दोन्ही सदस्यांचे राजीनामे घेऊन नवीन सदस्य नियुक्ती करण्याच्या सूचनाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली असल्याचे सांगण्यात आले
इन्फो
भाजपतील गटबाजी वाढू लागल्यानंतर महापालिकेत प्रभाव निर्माण करणाऱ्या एका गटाने आता संघटनेवर पकड घेण्याची तयारी चालू केली आहे. महापालिकेचे तिकीट वाटप आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी हा गट सरसावला असून, शहराध्यक्ष बदलण्यासाठी यापूर्वी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पक्षात अधिकच वाद वाढू लागला आहे.