मालेगाव : येथील गोसेवा समितीचे व विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी तातडीने नि:शुल्क पोलीस संरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना सादर केले होते. संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी कुटुंबासह येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले. गेल्या १४ फेब्रुवारी रोजी मच्छिंद्र शिर्के यांच्यावर एका गटाने प्राणघातक हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर शिर्के यांनी पोलीस संरक्षण मिळावे यासाठी पोलीस प्रशासनाकडे अर्ज सादर केले होते; मात्र पोलीस प्रशासनाने नि:शुल्क पोलीस संरक्षण देता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. पोलीस प्रशासनाने तातडीने संरक्षण द्यावे या मागणीसाठी शिर्के यांनी कुटुंबासह येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन छेडले. यावेळी नायब तहसीलदार निकम यांनी शिर्के यांची भेट घेऊन शासनाला याबाबत कळविण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात कविता शिर्के, शंभू शिर्के, दीपाली वाघ, सुशील वाघ आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
गोरक्षक शिर्के यांचे कुटुंबासह आंदोलन
By admin | Updated: March 18, 2017 23:31 IST