वणी : निफाड तालुक्यातील खडकजांब येथील दोन अल्पवयीन मुलांना दुचाकी लांबविताना सिनेस्टाइल पाठलाग करून ग्रामस्थानी रंगेहाथ पकडल्याची घटना मंगळवारी घडली. दुचाकी जप्त करण्यात आल्या असुन मुलांची रवानगी बाल न्यायालयात करण्यात आली आहे.येथील सदू बाळू ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एम.एच. १५-५७८३ या क्रमांकाची दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून घरात दळणाची पिशवी आणण्यासाठी गेले. पिशवी घेऊन बाहेर आल्यानंतर दुचाकी गायब असल्याचे त्यांना दिसुन आले. त्यानी परिसरातील ग्रामस्थांना ही बाब सांगितली. त्यानंतर त्वरित शोध मोहीम सुरू केली असता बाबा पुर गावाकडुन कच्च्या रस्त्यावरून एक अज्ञात सदर दुचाकी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. ग्रामस्थांनी पाठलाग करून त्यास पकडले. त्याच्याकडून दुचाकी ताब्यात घेत चौकशी केली असता हरिदास गोपीनाथ मोरे, रा. वावी ठुशी, ता. निफाड असे त्याचे नाव असल्याचे त्याने सांगितले. त्याच्यासोबत अनिल सखाराम चौधरी, रा. गाडेकरवाडी ओझर, ता. निफाड याचेकडे एम.एच.-१५- ७६८७ क्रमांकाची अन्य दुसरी दुचाकी आढळून आली. पोलिसांना याबाबत कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही दुचाकी जप्त करून या संशयिताना ताब्यात घेतले. सदर अल्पवयीन मुलांची टोळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)
अल्पवयीन मुलांना चोरी करताना पकडले
By admin | Updated: January 13, 2016 00:14 IST