नाशिक : स्वामी विवेकानंद यांची विश्वबंधुत्वाची संकल्पना अत्यंत व्यापक होती. प्रेम, सत्य, श्रद्धा, सामर्थ्य व राष्ट्रभक्ती या पाच गोष्टींद्वारेच ती प्रत्यक्षात साकारली जाऊ शकते, असे प्रतिपादन पुण्याच्या गरवारे महाविद्यालयाच्या प्रा. सुरुची पांडे यांनी केले. विवेकानंद केंद्राच्या नाशिक शाखेच्या वतीने ११ सप्टेंबर रोजीच्या विश्वबंधुत्व दिनाच्या पार्श्वभूमीवर शंकराचार्य संकुल येथे पांडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी ‘स्वामीजींना अभिप्रेत असलेली विश्वबंधुत्वाची कल्पना आणि उद्याचा भारत’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील त्यांच्या गाजलेल्या भाषणात विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडली होती. त्या भाषणाची सुरुवात त्यांनी ‘भगिनींनो आणि बंधूंनो’ अशी केली होती. भगिनींचा प्रथम उल्लेख करीत त्यांनी मातृशक्तीला नम्र अभिवादन केले होते. परदेशी स्त्रियांच्या कार्यसंस्कृतीमुळे स्वामीजी अत्यंत प्रभावित होते. भारतातील महिलांनाही या प्रकारचा वाव मिळावा, असे त्यांना वाटत असे. दुसरीकडे ते समुद्र ओलांडून अमेरिकेला गेल्याने त्यांच्यावर स्वदेशात मात्र टीका होत होती. त्या भाषणात स्वामीजींनी सर्व धर्म सत्य आहेत यावर आपला दृढ विश्वास असल्याचे प्रतिपादन केले होते. त्यातूनच त्यांनी विश्वबंधुत्वाचा संदेश दिला होता. प्रारंभी केंद्राच्या वतीने ‘दर्शन ध्येयासक्तीचे’, ‘सामान्य माणसाची असामान्य संघटना’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. केंद्र कार्यकर्त्या विद्या सालेमठ यांनी प्रास्ताविक केले. अभिषेक मुळे यांनी परिचय करून दिला. केंद्रप्रमुख जयंत दीक्षित यांनी स्वागत केले. निशिगंधा मुळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
प्रेम, सत्याद्वारेच विश्वबंधुत्व प्रत्यक्षात
By admin | Updated: October 5, 2015 00:01 IST