नाशिक : कौटुंबिक वादातून तरुणीचे अपहरण करून तिला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे़ या घटनेबाबत सोनल रामदास कासार (रा. गडकरी चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शताद्बी रुग्णालयाच्या आवारातून शुक्रवारी (दि. ६) रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित सविता छगन विधाते व प्रशांत यांनी कौटुंबिक कारणावरून बेदम मारहाण केली. तसेच दुचाकीवरून अपहरण करून गोविंदनगर परिसरातील अनमोल शिल्प अपार्टमेंटमध्ये घेऊन गेले़ याठिकाणी संशयित सविताच्या कुटुंबीयांनीदेखील शिवीगाळ करून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात सहा संशियतांविरोधात अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़आडगाव परिसरात एकावर हल्लाआडगाव परिसरातील धात्रक फाट्यावर एकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी (दि़ ८) पहाटेच्या सुमारास घडली़ जखमी झालेल्या इसमाचे नाव अविनाश सवई (४२) असे आहे़ धात्रक फाट्यावरील अथर्व रो-हाऊसमध्ये राहणाऱ्या सवई यांच्यावर वार करण्याचे कारण समजू शकले नाही़ या घटनेनंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी परिसरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले़ याप्रकरणी त्यांचे बंधू रमेश सवई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ भद्रकालीत एका संशयितास अटकघरफोडीच्या तयारीत असलेल्या व अंधारात लपून बसलेल्या एका संशयितास भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोहेल मोईनोद्दीन शेख (१९, रा. पंचशीलनगर) असे या संशयिताचे नाव आहे. शनिवारी (दि.७) पहाटे २ वाजेच्या सुमारास पिंपळ चौकातील अंधारात तो लपून बसलेला होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घरमालकावर गुन्हा दाखलसतरा दिवसांपूर्वी घरातील भिंत कोसळून जखमी झालेल्या महिलेने घरमालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, कुसुमबाई सोमनाथ वासनकर (५०, रा़ काझीगढी, कुंभारवाडा) या २० आॅक्टोबरला दुपारी एक वाजेच्या सुमारास थकवा आल्याने काझीची गढी येथील १५१४ क्रमांकाच्या घराच्या पायरीवर बसल्या होत्या़ त्यावेळी अचानक घराची भिंत कोसळली व त्यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली होती़ याप्रकरणी सविता सुदाम उखाडे (३०, कुंभारवाडा, घर नंबर १५१६ व १५१७ च्या घरमालकाविरोधात फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)
कौटुंबिक वादातून तरुणीचे अपहरण
By admin | Updated: November 9, 2015 00:31 IST