नाशिक : कुंभमेळ्याच्या तिन्ही पर्वण्या निर्विघ्न पार पडल्या. साधू-महंतही आखाडे, खालशांसह मार्गस्थ झाले. पवित्र गोदावरी व कुशावर्तात स्रान करून लाखो भाविक पुण्यही पदरात पाडून आपापल्या घरी गेले. त्याचप्रमाणे या पर्वाच्या यशस्वीतेसाठी ज्या काही यंत्रणांनी बरे-वाईट कामे केली, त्याचा गाळही गोदावरीत वाहून गेला. त्यामुळे सर्वार्थाने कुंभ यशस्वी केल्याबद्दल राज्य सरकारच्या प्रमुखांकडून त्याचे कोडकौतुक एकदा नव्हे, तर दोनदा करून झाल्याने तसे म्हटले, तर तेरा महिने चालणारा सिंहस्थाचा पर्व महिना-दीड महिन्यात संपुष्टात आणल्याचा जल्लोष साजरा केला नाही, तर उत्सवाचा गोडवा निघून जाईल, असे बहुधा प्रशासकीय यंत्रणेला वाटले असावे म्हणून की काय ‘आटोपत्या सिंहस्थ’ भोजनाचे त्यांना आयोजन करावे लागले आहे. जिल्हा प्रशासन प्रमुखांच्या दरबारी पार पडलेल्या या सुग्रास भोजनाची दरवळ थेट मुख्यालयाच्या कचेरीत पोहोचल्यामुळे त्याची खुली चर्चा होऊ लागली. अर्थातच काही कुचकटांकडून या भोजनाबद्दलही नको त्या शंका वा संशय व्यक्त करून पाच दशक संख्येच्या भोजनासाठी किती खर्च आला, असा प्रश्न विचारला जात असला तरी, त्याचे उत्तर देण्याच्या भानगडीत कोणी पडले नाही हे बरे. अन्नदानासारखे पुण्यदान कोणतेच नसते हे साऱ्याच धर्मग्रंथात नमूद केलेले असल्यामुळे अन्नग्रहण करणाऱ्यांना त्या अन्नाचा वा त्याच्या दात्याचा शोध घेण्याची तशीही गरज नसते. त्यामुळे बुधवारी रात्री ज्या स्थळी हा उदरभरणाचा सोहळा आयोजित केला होता, त्याचा दाता कोण असेल, हे नव्याने सांगण्याची तशी गरजही नाही. रात्रीचे जेवण म्हटल्यावर ज्या काही अपेक्षा तत्पूर्वी बाळगल्या त्यांना पूर्णपणे फाटा देण्यात आल्याने अनेकांना जेवणाअगोदर ‘सुपा’वर भागवावे लागले, तर ‘सामीष’ भोजनाची अपेक्षा ठेवून आलेल्यांचे ‘वांगे भरीत’ झाले. वास्तू तीच, परंतु व्यक्ती बदलल्याने त्याच्या आवडी-निवडीही कशा बदलतात, याचा अनुभव अनेकांनी घेतला व काहींना भूतकाळाच्या आठवणींनी गहिवरूनही आले. तर काहींना पोट भरलेले असूनही ते रिते-रितेच असल्याची वेळोवेळी जाणीवही झाली. अर्थातच कुंभमेळ्यात दिवस-रात्र राबलेल्या मोजक्याच हातांसाठी हा सोहळा होता, त्यातही पुन्हा कुंभमेळ्याच्या नावे कार्यक्रमाचे आयोजन केलेले असल्याने त्यात शाकाहारापेक्षा अन्य आहारांची चव लागणेही शक्य नव्हते. (प्रतिनिधी)
हुश्श... झाले बुवा एकदाचे!
By admin | Updated: October 16, 2015 00:02 IST