घरकुलांचे काम पाच वर्षांपासून अर्धवटचनाशिक : गंजमाळ येथील भीमवाडी येथे महापालिकेने सुरू केलेल्या घरकुल योजनेचे काम करारानुसार पंधरा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असताना पाच वर्षे झाले तरी पूर्ण झालेले नाही. त्यातच ४८० कुटुंबांना स्थलांतरित करून येथे योजना साकारली जात असताना प्रत्यक्षात मात्र १४० कुटुंबांनाच घरे मिळणार असून, उर्वरित ३४० लाभार्थींना बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे योजनेची चौकशी करावी, अशी मागणी बी. आर. आंबेकर लाईफ मिशन मंचने केली आहे.यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांनाही निवेदन दिले आहे. गंजमाळ येथील भीमवाडीत महापालिकेने नेहरू नागरी अभियानाअंतर्गत घरकुल योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्याचे भूमिपूजन १५ सप्टेंबर २०१० रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. केंद्र शासनाच्या आदेशानुसार वेळेत घरकुल बांधणे आवश्यक होते. त्यासाठी त्याची मुदत १५ महिने होती. परंतु पाच वर्षे झाले तरी अद्याप योजनेचे काम सुरूच आहे. विशेष म्हणजे ४८० घरकुले बांधण्यासाठी योजना आखण्यात आली. मात्र, आता १४० पात्र कुटुंबांनाच घरे देण्यात येणार असून, तसे आश्वासन पत्र देण्यात आले आहे. असे असेल तर उर्वरित ३४० कुटुंबांनी कोठे राहायचे? असा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. मुळात घरकुल योजनेचे कामही नित्कृष्ट दर्जाचे असल्याचा संबंधित संघटनेचा आरोप आहे. त्यासाठी नित्कृष्ट बांधकाम साहित्य वापरण्यात आले असून, घरे केव्हाही कोसळू शकतात, असा आरोप संघटनेने केला आहे. या सर्व प्रकारची चौकशी करावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर साळवे तसेच सतीश कापसे, रुक्मिणी भोंड, नसीम शेख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
घरकुलांचे काम पाच वर्षांपासून अर्धवटच
By admin | Updated: November 24, 2015 22:31 IST