नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल घोषित होण्यास येत्या २३ आॅगस्टला सहा महिने पूर्ण होत आहेत. परंतु, महापालिकेवर आरक्षित जागांवरून निवडून गेलेल्या पाच नगरसेवकांनी अद्याप आपले जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक शाखेला सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. पाच नगरसेवकांमध्ये दोन भाजपा तर राष्टÑवादी, शिवसेना आणि मनसे या पक्षामधील प्रत्येकी एक नगरसेवकाचा समावेश आहे.महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. २१ फेबु्रवारी २०१७ रोजी मतदान होऊन दि. २३ फेबु्रवारीला मतमोजणी झाली होती. या निवडणुकीत प्रभाग २ (क) मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटात भाजपाचे उद्धव निमसे यांनी दुसºया क्रमांकावर राहिलेल्या सेनेच्या जे. टी. शिंदे यांचा पराभव केला होता. प्रभाग २३ (ब) मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात भाजपाच्या शाहीन मिर्झा सलीम बेग यांनी दुसºया क्रमांकावर राहिलेल्या सेनेच्या निर्मल राजेश थेटे यांचा पराभव केला होता. तसेच प्रभाग १४ (ब) मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात राष्ट्रवादीच्या समीना शोएब मेमन यांनी दुसºया क्रमांकावर राहिलेल्या अपक्ष उमेदवार नाजीया जाकीया अत्तार यांच्यावर विजय मिळविला होता. प्रभाग क्रमांक ११ (ब) मधून अनुसूचित जमाती गटात मनसेचे योगेश किरण शेवरे यांनी दुसºया क्रमांकावरील भाजपाचे विठ्ठल लहारे यांना पराभूत केले होते, तर प्रभाग २२ (ब) मधून शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर यांनी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या गटात निवडणूक लढवत दुसºया क्रमांकावरील भाजपाच्या दीपाली कोठुळे यांच्याविरुद्ध विजय संपादन केला होता. या पाचही नगरसेवकांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करताना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नव्हते मात्र, सहा महिन्यांच्या आत आपण ते निवडणूक शाखेला सादर करू, असे प्रतिज्ञापत्रही लिहून दिले होते. आता सहा महिन्यांचा कालावधी येत्या २३ आॅगस्टला संपत असून, अद्याप या पाचही नगरसेवकांचे जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक शाखेला सादर झालेले नाही. मुदतीत प्रमाणपत्र सादर न झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते.