नाशिक : नागपूर येथील किराणा घराण्याच्या गायिका डॉ. तनुजा नाफडे यांच्या शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीताच्या मैफलीत सुरांची मुक्त उधळण श्रोत्यांसाठी आनंददायी ठरली. नाफडे यांच्या सुमधुर गायनाने धुलिवंदनाची सायंकाळ संगीतमय केली.कुसुमाग्रज स्मारकात ‘कुसुमाग्रज स्मरण’ उपक्रमांतर्गत नागपूर येथील गायिका डॉ. तनुजा नाफडे यांच्या शास्त्रीय-उपशास्त्रीय मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. नाफडे यांनी आपल्या मैफलीची सुरुवात राग मारुबिहागने केली. ‘सावरीया तोसे लागे नैन’ या बंदिशीनंतर नाफडे यांनी द्रुत तीनतालात ‘मन ले गयो सॉँवरीया’ ही रचनाही श्रोत्यांकडून दाद मिळवून गेली. त्यानंतर नाफडे यांनी होळीचे औचित्य साधत काही खास रचना पेश केल्या. उपशास्त्रीय गायनात ‘रंगी सारी गुलाबी सॉँवरीयाने’ही होरी सादर करत मैफलीत रंग भरले. त्यानंतर ‘सावन की रुत आयी’ या कजरीने तर मैफलीची उंची गाठली. ‘मोरी बाली उमर बिती जाए’ ही ठुमरी तर ‘बहोत दिन बिती’ या पंजाबी ठुमरीलाही रसिकांनी मुक्तहस्ते दाद दिली. ‘रसके भरे तोरे नैन’ या भैरवीने मैफलीची सांगता झाली. नाफडे यांना साथसंगत नितीन वारे (तबला), दिव्या जोशी-रानडे (संवादिनी), अनिल दैठणकर (व्हायोलिन) आणि जाई कुलकर्णी (तानपुरा) या कलावंतांनी केली. प्रारंभी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष किशोर पाठक यांनी स्वागत केले. मकरंद हिंगणे यांनी सूत्रसंचालन केले.(प्रतिनिधी)
संगीताच्या मैफलीत सुरांची मुक्त उधळण
By admin | Updated: March 7, 2015 01:24 IST