कळवण : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या शासकीय वसतिगृह नाकोडा येथील विद्यार्थ्यांनी निकृष्ट जेवण व शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवल्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आश्वासनंतर तब्बल आठ तासांनी आंदोलन मागे घेतले. प्रकल्प अधिकारी गंगाथारण यांनी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ व अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी संघटनेचे लकी जाधव याच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांना शक्य त्या सुविधा सात दिवसात देण्याचे आश्वासन दिले. इतर सुविधा पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव पाठविल्याचे त्यांनी सांगितले.मुलांना अनेक दिवसांपासून निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असून, शैक्षणिक वर्ष संपत आले तरी शालेय पुस्तके व शैक्षणिक साहित्य मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आल्याने आदिवासी विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्री प्रकल्पाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेण्यास यंत्रणा न आल्याने मोर्चा नाशिक आयुक्त कार्यालयाकडे वळविला. रात्री १० वाजता मानूर येथे पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांची मनधरणी केल्यानंतर विद्यार्थी माघारी फिरले. मंगळवारी (दि.१२) सकाळी शाळेत जाण्याबाबत नकार दर्शवत मागण्यांकडे विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. प्रकल्पाधिकारी गंगाथरण चर्चा करणार नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. प्रकल्पाधिकारी गंगाथरण हे बाहेरगावी आहे. विद्यार्थ्यांनी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर ठाण मांडल्याने प्रशासनाची झोप उडाली. रात्री उशीरापर्यंत आदिवासी प्रकल्प कार्यालय येथील जबाबदार अधिकारी येथे पोहचू न शकल्याने आंदोलन सुरूच होते. दबावामुळे ह्या प्रश्नाला वाचा फुटत नाही. नाशिकला मार्गस्थ झालेल्या विद्यार्थ्यांशी मानूरला पोलीस निरीक्षक मधुकर गावित यांनी संवाद साधून शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवा, असे आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी आदिवासी आयुक्त सोनाली पोंक्षे यांच्याशी चर्चा केली. शिवसेना जिल्हाप्रमुख कारभारी अहेर यांनी प्रश्नासंदर्भात पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन भाजपा जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी दिले. त्यानंतर रात्री उशिरा विद्यार्थ्यांची मनधरणी करून त्यांना माघारी फिरविण्यात यश आल्यानंतर नगरसेवक जयेश पगार यांनी विद्यार्थ्यांना वसतिगृहावर रवाना केले. यावेळी सागर खैरनार, उमेश तेली, जितेंद्र वाघ, साहेबराव पगार, विनोद मालपुरे उपस्थित होते. (वार्ताहर)
आठ तासानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे
By admin | Updated: January 13, 2016 00:12 IST