पिळकोस : कळवण तालुक्यातील पूर्वभागातील पिळकोस, बेज, भादवण, विसापूर, बिजोरे, बगडू, भेंडी यांसह परिसरातील सर्व गावांतील पिके पावसाअभावी जळून खाक झाली असून, तेथील विहिरीसुद्धा कोरड्याठाक झालेल्या आहेत. पाऊस नसल्यामुळे व विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांनी पिकांची आशा सोडून दिली आहे.पाऊस झाला नसल्यामुळे नदी- नाले, बंधारे हे कोरडे झाले असून, रानात चरणाऱ्या जनावरांना गवताची काडीदेखील नसल्याने परिसरातील शेतकरी, पशुपालक, शेतमजूर, मेंढपाळ, गुराखी हे पिकांचे व पशुधनाचे हाल होत असल्यामुळे हवालदिल झाले आहेत. पाऊस येईल असे कुठलेच चिन्ह दिसत नाही व प्रशासकीय यंत्रणाही दुष्काळी परिस्थितीबाबत उपयोजना आखत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतीवर अवलंबून असलेल्या जनतेवर दुष्काळाचे सावट ओढवल्याने चारा, पाणी तसेच रोजंदारीचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावू लागला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.आजपर्यंत पिके वाचविण्याचा शेतकरी प्रयत्न करत होते; परंतु आजपर्यंत पाऊस आलाच नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पिके सोडली असून, प्रशासन दुष्काळी परिस्थिती असूनदेखील तालुकापातळीवरून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा ग्रामस्थांकडून होत आहे.आज रोजी शासकीय यंत्रणेने परिस्थितीचा आढावा घेऊन पशुधनाला चारा उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांच्या हाती पैसे नसतानादेखील महागडा चारा विकत घ्यावा लागत आहे, तर काही शेतकऱ्यांनी आपली जनावरे चाऱ्याअभावी विकून टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले.पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले असून, पाऊस येईल एवढी आशा अजूनही काहींनी बोलून दाखविली.एकंदरीत शेतकरी बांधवानी शेतीसाठी खरिपाला लावलेले सर्व भाग-भांडवल वाया गेले असून, परिसरातील शेतकरी परिस्थितीला तोंड देत देत हताश झाले आहेत. आजची दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला तर शेती व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला असून, पिके वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले आहेत. (वार्ताहर)हातातोंडाशी आलेले पीकही पाऊस व विहिरीला पाणी नसल्याने सोडावे लागत आहे. १९७२चा दुष्काळ भोगला आहे, त्यावेळी खरीप पिके आली होती. जनावरांना मुबलक चारा होता. मात्र आज शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.
१९७२ पेक्षाही यंदा तालुक्यात दुष्काळी स्थिती गंभीर
By admin | Updated: September 4, 2015 23:00 IST