नाशिक : धुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना करण्यात आलेल्या मारहाणीची घटना ताजी असतानाच नाशिक जिल्हा रुग्णालयातही रुग्णाच्या नातेवाइकांकडून प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकारी व परिचारिकेस धक्काबुक्की व मारहाणीची घटना गुरुवारी (दि. १६) रात्रीच्या सुमारास स्वाइन फ्लू कक्षात घडली़ या मारहाणीच्या निषेधार्थ वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते़ दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करणारा संशयित सत्तार युसूफ शहा (६९, रा़ निमपूळ, ता़ जि़ धुळे) यास संगमनेर येथून अटक करण्यात आली आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगमनेर येथील नासीर शौकत शहा यांना स्वाइन फ्लू झाल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दाखल करण्यात आले होते़ गुरुवारी रात्रीच्या सुमारास उपचारादरम्यान नासीर शहा यांचा मृत्यू झाला़ यामुळे संतप्त झालेली त्यांची आई व इतर नातेवाइकांनी या कक्षातील अधिपरिचारिका चारुशिला इंगळे व वैद्यकीय अधिकारी राहुल नामदेव पाटील यांना धक्काबुक्की करून मारहाण केली़जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात सुरू असलेल्या या गोंधळाची माहिती तत्काळ सरकारवाडा पोलिसांना कळविण्यात आली़ त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली तर या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर जाहीर निषेध करून काम बंद आंदोलन केले़ यामुळे काही काळ रुग्णांचे हाल झाले़ दरम्यान, याप्रकरणी डॉ़ राहुल पाटील यांच्या फिर्यादीवरून मयत नासीर शहा यांची आई व दोन नातेवाइकांविरोधात सरकारवाडा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा, महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांना मारहाण
By admin | Updated: March 18, 2017 23:47 IST