अझहर शेख/ आॅनलाइन लोकमत
नाशिक, दि. 8 - जुने नाशिकमधील संत गाडगे महाराज धर्मशाळेला लागून असलेल्या काजी गढीच्या संरक्षणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. गढीवासीयांच्या संरक्षक भिंतीच्या मागणीलाही यश आले नसून, गोदाकाठालगतच्या दिशेने असलेल्या गढीच्या असुरक्षित झालेल्या भागावरील रहिवासी जागा सोडण्यास तयार नसल्याने पावसाळ्यातील आपत्ती टळणार कशी, असा प्रश्न सध्या महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला पडला आहे.दरवर्षी पावसाळा आला की, महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेली नोटीस गढीच्या रहिवाशांच्या हाती पडते. यंदाही हे सोपस्कार पार पाडले गेले असावे, असा कयास आपत्कालीन विभागाच्या प्रमुखांनी व्यक्त केला. तसेच या पंचवार्षिक निवडणुकीपासून गढीच्या पालकत्वाची जबाबदारी सांभाळणारा विभागही महापालिका प्रशासनाने बदलला आहे. एकूणच गढीला नवीन ‘पालक’ प्रशासकीय स्तरावर लाभले असले तरी समस्या सुटणार कधी, असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या प्रभागात पूर्व विभागाकडे गढीच्या पालकत्वाची जबाबदारी होती, मात्र निवडणुकीच्या नवीन प्रभाग रचनेत जुन्या प्रभाग २९ मधील गढी प्रभाग १३ मध्ये समाविष्ट केली गेली असून, हा प्रभाग पश्चिम विभागातील आहे. एकूणच गढीला नवीन प्रभाग मिळाला असला तरी जुन्या प्रभागाचे माजी लोकप्रतिनिधी व विद्यमान प्रतिनिधी यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर हा परिसर आहे.
पावसाळ्यात गढीची माती ढासळण्याचा धोका कायम आहे. येथील रहिवाशांनी स्थलांतरास विरोध कायम ठेवला आहे. गेल्या वर्षी दोनवेळा गढी पावसाळ्यात ढासळली होती. यामुळे अग्निशामक विभागासह आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्काळ नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच प्रशासनाला ‘अलर्ट’ जारी करण्यात आला होता. अद्याप गढीचा तिढा सुटलेला नसून गढी सुरक्षित नसल्याने पावसाळ्यात गढीची आपत्ती ओढावण्याची दाट शक्यता आहे. यावर्षीही पावसाने वेळेवर शहरात वर्दी दिली आहे. गढीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा यानिमित्ताने चर्चेत आला आहे.
पुरातत्त्व विभागाचा काणाडोळा-१९५० सालापासून भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या काजी गढीच्या संरक्षणाची जबाबदारी या विभागाची आहे. ‘क’ गटातील संरक्षित वास्तू म्हणून पुरातत्त्व विभागाच्या औरंगाबाद कार्यालयाने त्यांच्या संकेतस्थळावरील नाशिकच्या संरक्षित वास्तूंच्या यादीत काजीची गढी पाचव्या क्र मांकावर ‘जुनी मातीची गढी’ या नावाने उल्लेख आहे. पुरातत्त्व विभागाने या वास्तूकडे अद्याप लक्षच दिले नाही. संवेदनशील वास्तू म्हणून याकडे काणाडोळा क रणे पसंत केले. परिणामी गढी धोकादायक बनली असून, या गढीवरील रहिवाशांवरही टांगती तलवार आहे.