सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील काही कारखानदारांनी त्यांच्या कारखान्यातील रासायनिक केमिकलयुक्त पाणी थेट पावसाळी नाल्यात सोडले असून, या दूषित पाण्यामुुळे येथील शेतकऱ्यांच्या जमिनीदेखील नापीक झाल्याने शेतकऱ्यांचा उदारनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित पाणी पावसाळी नाल्यांत सोडू नये, असे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिल्यानंतरही यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अंबड औद्योगिक वसाहतीतील जे व एफ सेक्टरसह इतर भागात पावडर कोटिंगचा वापर करून व प्लेटिंग तसेच रासायनिक केमिकल्सचा वापर करून जॉब तयार करण्याचे कारखाने आहेत. या कारखान्यांनी त्यांचे केमिकलयुक्त पाणी थेट पावसाळी नाल्यात सोडले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हेच दूषित पाणी जमिनीत झिरपत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या विहिरींनादेखील हिरवळ व दूषित पाणी येत आहे. यामुळे शेतात पीकच येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये उपासमारीची वेळ आली आहे. दूषित पाण्यामुळे पिके जळून जात असून, शेत नापिक झाले आहे. याबाबत शासनस्तरावर पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नसल्याले चित्र बघावयास मिळत आहे. कारखान्यांचे केमिकलयुक्त दूषित पाणी पावसाळी नाल्याद्वारे थेट नासर्डी नदीत जात असल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. असे केमिक लयुक्त पाणी पावसाळी नाल्यात सोडू देऊ नये, असे आदेश उद्योगमंत्र्यांनी दिलेले असतानाही याबाबत अद्याप शासनाकहून कोणतीही दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. अंबड येथील अल्फ इंजिनिअरिंग या कारखानदाराने लाखो रुपये खर्च करून या दूषित पाण्यासाठी स्वतंत्र एसटीपी प्लान्ट तयार केला आहे. कारखान्यांच्या दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
By admin | Updated: June 10, 2016 00:08 IST