नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल २२ जणांचे प्राण गेल्यानंतर दोन महिने उलटले मात्र, या नंतरही या दुर्घटनेत दोषी कोण याचा स्पष्ट उलगडा अद्यापही झालेला नाही. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या समितीच्या काही शिफारशी मात्र, राज्य सरकारने स्वीकारल्या असून, भविष्यात अशी दुर्घटना टाळण्यासाठी काय दक्षता घ्यावी याच्या सूचना महापालिकांना करण्यात आली आहेत,
नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात गेल्या २१ एप्रिल रोजी ऑक्सिजन गळतीची दुर्घटना घडली होती. महापालिकेने या रुग्णालयात एका ठेकेदार एजन्सीकडून ऑक्सिजनची टाकी बसवली असून, त्यातून रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करताना पाइपलाइनचे नोझल तुटल्यामुळे ऑक्सिजन गळती झाली त्यामुळे २२ रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. राज्याला हादरवणाऱ्या या घटनेमुळे पालकमंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्याच दिवशी नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाला भेटी दिल्या तसेच मृतांच्या नातेवाइकांना राज्य शासनाकडून पाच आणि महापालिकेकडून पाच लाख असे एकूण दहा लाख रुपयांची आर्थिक मदतदेखील जाहीर केली त्याचवेळेस अशा प्रकारची दुर्घटना कोणत्या निष्काळजीपणामुळे घडली याची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीला पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र गमे यांनी वेगाने कार्यवाही पूर्ण करून मुदतीपूर्वी चौकशी अहवाल आणि शिफारसी राज्य शासनाला सादर केल्या आहेत.
या दुर्घटनेला दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे, मात्र त्यानंतरही या दुर्घटनेला जबाबदार कोण हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. विभागीय आयुक्तांनी अहवाल सादर केला आणि आपली जबाबदारी पार पडली असती तरी शासनाने या अहवालाचे पुढे काय केले यावर शासकीय पातळीवर मौन बाळगले जात आहे. २१ जून रोजी या दुर्घटनेला दोन महिने पूर्ण होत आहेत, मात्र अद्यापही दोषी कोण याचा छडा लागलेला नाही.
दरम्यान, राज्य शासनाने गमे अहवालातील काही शिफारसी स्वीकारल्याचे सांगण्यात येत असून, काही दिवसांपूर्वीच सर्व महापालिकांना ऑक्सिजन गळतीसाठी दुर्घटना कशी टाळता येईल या संदर्भात सूचना केल्या आहेत बहुतांशी सूचनांचे पालन अगोदरपासूनच नाशिक महापालिका करीत असली तरी दोषी कोण हे मात्र गुलदस्त्यात राहिले आहे.
इन्फो...
केवळ सूचनाच...
ऑक्सिजन गळतीसारखी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी शासनाने अशा आपत्ती काळासाठी पर्यायी ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था करावी, ऑक्सिजन टाकीची नियमित देखभाल करावी यासह काही सूचना केल्या आहेत.