श्याम खैरनार सुरगाणातालुक्यात वर्चस्व असलेल्या माकपचा गोंदुणे गट बालेकिल्ला समजला जातो. याठिकाणी पक्ष नेतृत्वाकडून जो उमेदवार उभा केला जातो तो हमखास निवडून येत असल्याकारणाने या गटात निवडणूक लढण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. यावेळी हा गट ओबीसी महिला राखीव असल्याने या गटातून तालुक्यातील व तालुक्याबाहेरील अनेकजण इच्छुक आहेत.मागील पंचवार्षिक निवडणुकीत माकपचे उमेदवार भिका राठोड १४ हजार २७७ मते मिळून विजयी झाले होते, तर राष्ट्रवादीचे उमेदवार एन.डी. गावित यांना ११ हजार ९७ मते मिळाली होती. भाजपाचे भरत भोये यांना ५९० मते मिळाली होती. या गटातील तोरणडोंगरी व परिसरातील माकपचे एकगठ्ठा मतदान तीन हजाराच्या आसपास होते. यावरून या गोंदुणे गटात पक्षीय बदलाचा विचार केल्यास माकपची बाजू वरचढ दिसते. राष्ट्रीवादी कॉँग्रेस, भाजपा व शिवसेना यांनी युती करून लढा दिल्यास माकपाला शह देऊ शकतात. या गटात गोंदुणे व भदर हे दोन गण असून, गेल्या निवडणुकीत दोन्ही गणात माकपचेच उमेदवार निवडून आले होते. गोंदुणे गट ओबीसी महिला राखीव आहे. या गटासाठी प्रत्येक पक्षाकडे स्वत:चा असा ओबीसी उमेदवार नाही. त्यातच हा गट म्हणजे माकपचा बालेकिल्ला असून, येथे कोणताही उमेदवार उभा केला तर तो हमखास निवडून येत असल्याने तालुक्यासह तालुक्याबाहेरील अनेकजण या गटात घरातील महिला उमेदवार देण्यास इच्छुक आहेत.गट व गणात मागील पंचवार्षिक निवडणुकीतील मतांचे बलाबल पहाता माकपची बाजू वरचढ दिसून येते. या तीनही ठिकाणी निवडणूक लढवताना विरोधक भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी हे विकासाचा मुद्दा पुढे करतील.राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार ए.टी. पवार यांनी काही कामे केली असल्याने त्यांची काहीअंशी जमेची बाजू समजली जात आहे. विरोधक पक्षांची युती होण्याची सूतराम शक्यता नसल्याने गट व दोन्ही गणात माकप, राष्ट्रवादी व भाजपा अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. रस्ते, पाणीटंचाई, आरोग्य, शेती, नागरी समस्या अजूनही असल्याने नाराज मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. मागील मतांची आकडेवारीकडे लक्ष वेधल्यास तीच पुनरावृत्ती होऊन खरी लढत माकप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोघातच होणार काय? तर चमत्कार होऊन राष्ट्रवादी किंवा भाजपा यापैकी कोण मुसंडी मारतो हे निकालाअंति स्पष्ट होईलच.सद्यस्थितीत गट व गणाकरिता माकप, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा व राष्ट्रीय काँग्रेसकडून महिला उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. तालुक्यात वर्चस्व असलेल्या माकपला शह देण्यासाठी भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी युती करणार काय याबाबतही चर्चा सुरू आहे. माकपला शह देण्यासाठी महायुती झालीच तर राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना प्रत्येकी एक गट घेण्याची व प्रत्येकी दोन गण घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र असे होण्यासाठी महायुती होऊन मनापासून मनोमीलन होण्याची खरी आवश्यकता आहे. असे न झाल्यास माकपला रोखणे अशक्य आहे. खरे तर युती होणार की नाही याबाबतच खरी साशंकता आहे.
बालेकिल्ला राखण्यासाठी माकपाची तयारी
By admin | Updated: January 14, 2017 00:23 IST