नाशिक : सध्या परिवर्तनवादी चळवळींचा प्रस्थापितांवरील दबाव कमी होत आहे. भांडवलशाही व्यवस्थेकडून विद्वान, प्राध्यापकांना विकत घेतले जात असून, त्यांच्याकडून हवे ते वदवून घेतले जाते आहे. परिवर्तनवादी चळवळीत फूट पाडण्याचे षड्यंत्र रचण्यात आले असल्याने पुरोगामी लेखकांनी कमीत कमी पुढच्या शंभर वर्षांचा विचार करून तडजोडी करू नयेत, असे परखड प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी केले. परिवर्त त्रैमासिक जनता परिवाराच्या वतीने आयोजित परिवर्त साहित्य परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. रोटरी क्लब सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभ्यासक सुधाकर गायकवाड होते. मंगला खिंवसरा, प्राचार्य डॉ. बी. बी. प्रधान, जयेश कर्डक, सुनील तिरमारे, प्रा. गंगाधर अहिरे उपस्थित होते. यावेळी डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, पूर्वी दादासाहेब गायकवाड, वामनदादा कर्डक हे पैशाने कफल्लक असूनही त्यांचा प्रस्थापितांवर दबाव होता. आता मात्र संपत्तीधारक, व्यवस्थेच्या प्रतिपालकांवर चळवळीचा दबाव कमी असल्यानेच दाभोलकर, पानसरे यांच्या हत्त्या झाल्या. राजकारण ही वाईट गोष्ट नाही. राजकारण सत्तेकडे घेऊन जाते व सत्ताच परिवर्तनाचे सामर्थ्य देते; मात्र आता सत्ता कशासाठी वापरावी, याचे भानच राहिलेले नाही. १९९० नंतरचे बदललेले जग समजून घेण्याची वेळ आली आहे. जगातील प्रत्येक गोष्ट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि ऐपत असेल तर कोणीही ती विकत घेऊ शकतो, या दोनच गोष्टींवर सर्वांचा विश्वास बसू लागला आहे. त्यामुळे तत्त्वज्ञानाची गरजच उरलेली नाही. भांडवलशाही व्यवस्थेतेतील माणसे खेळाडूंबरोबरच आता विद्वान, प्राध्यापक, माध्यमे अशा सर्वांनाच विकत घेऊ लागली आहेत. परिवर्तनवाद्यांच्या बाजूने बोलणारे लोकच विकले जाऊ लागल्याने आव्हान आणखी अवघड झाले आहे. या देशात इंग्रजांनी फूट पाडलेली नाही, तर जातींमुळे तो आधीच विभागलेला होता. देशात निरनिराळ्या जातींतील लोकांना एकत्र येऊ दिले जात नाही. परिवर्तनवाद्यांची ताकद कमी करून त्यांच्या फूट पाडण्याचे षड्यंत्रच रचण्यात आले असून, आपल्या सुरात सूर मिळवणारी माणसे विकत घेणे हा त्या योजनेचाच भाग आहे. प्रारंभी डॉ. बी. बी. प्रधान यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर लोकशाहीर गणपत जाधव यांनी प्रेरणागीते सादर केली. त्यांना सुहास सुरळीकर यांनी संगीतसाथ केली. स्वागताध्यक्ष रवि पगारे यांनी स्वागत केले. प्रा. गंगाधर अहिरे यांनी परिषदेची भूमिका मांडली. मान्यवरांच्या हस्ते ‘परिवर्त’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. जयश्री खरे व किशोर शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नानासाहेब पटाईत यांनी आभार मानले.व्याख्यान व कविसंमेलन परिषदेच्या दुसऱ्या सत्रात ‘परिवर्तनाच्या चळवळीत महिलांचा सहभाग धूसर झाला आहे?’ या विषयावर प्रा. मंगला खिंवसरा यांनी मार्गदर्शन केले. आजही सातबाराच्या उताऱ्यावर पुरुषाचे नाव असणे हे पुरुषसत्ताक व्यवस्थेचे प्रतीक आहे. त्याविरुद्ध लढा दिल्यानंतर महिलांची नावे लावण्यात आली. स्त्रियांचा चळवळींतील मोर्चांत सहभाग वाढत असला, तरी त्यांचे वैचारिक अधिष्ठान आणखी भक्कम करायला हवे. स्त्रियांचा आदर करणे, त्यांना स्वातंत्र्य देणे हे आंबेडकरी विचारांत अभिप्रेत असल्याचे त्या म्हणाल्या. करुणासागर पगारे अध्यक्षस्थानी होते. यावेळी भगवान हिरे, प्रा. इंदिरा आठवले, काशीनाथ वेलदोडे उपस्थित होते. अखेरच्या सत्रात कवी किशोर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन रंगले. त्यात कवींनी आपल्या रचना सादर करीत श्रोत्यांची दाद घेतली. रवींद्र मालुंजकर व प्रा. जावेद शेख यांनी सूत्रसंचालन केले.
परिवर्तनवादी चळवळीत फूट पाडण्याचे षड्यंत्र
By admin | Updated: May 11, 2015 01:11 IST