लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : छोटेखानी समारंभ आणि सामाजिक कार्यक्रमांना उपयुक्त ठरावे यासाठी महापालिकेने सार्वजनिक मंडळे, सेवाभावी संस्था यांना समाजमंदिरे करारानुसार चालविण्यास दिली आहेत. प्रभागातील गोरगरिबांना त्यांचे कौटुंबिक कार्यक्रम घेता यावेत यासाठी अल्पदरात समाजमंदिर उपलब्ध करून देण्याची तरतूद असतानाही खासगी संस्थांकडून मात्र भरघोस शुल्क आकारणी केली जात असल्याची तक्रार आहे. याप्रकरणी महापालिकेने संबंधिताना सूचना देऊन त्यांच्यावर नियंत्रण आणावे, अशी मागणी होऊ लागली आहे. इंदिरानगर परिसरातील समाजमंदिरे विविध संस्था तसेच मंडळांना देण्यात आली आहेत. परंतु येथील कार्यक्रम पाहता ही समाजमंदिरे व्यवसायासाठी आहेत की सर्वसामान्यांसाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष घालून पालिकेच्या मिळकतीवर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे. इंदिरानगर परिसरात मोठ्या प्रमाणात कॉलनी आणि अपार्टमेंट आहेत. तसेच सरकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी वास्तव्यास आहेत. त्याप्रमाणे मध्यमवर्गीयांची संख्यादेखील मोठी आहे. असे असतानाही परिसरातील समाजमंदिरांचा वापर सर्वसामान्य नागरिकांसाठी होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. इंदिरानगर, परबनगर, किशोरनगर, राजीवनगर, कमोदनगर, राजीवनगर, विनयनगर, राणेनगर यांसह अनेक ठिकाणी समाजमंदिरांची उभारणी करण्यात आलेली आहे. ही समाजमंदिरे सार्वजनिक मंडळे, संस्था आणि संघटनांना देखभालीसाठी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अल्पदरात समाजमंदिरे उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती. मात्र परिस्थिती नेमकी याउलट आहे. सर्वसामान्यांकडूनही मोठी रक्कम आकारली जात असल्याने या समाजमंदिरांचा उपयोग ज्या समाजघटकांना होणे अपेक्षित आहे त्यांना तो होताना दिसत नाही. सध्या समाजमंदिरांमध्ये विविध खेळांची शिबिरे सुरू आहेत. तसेच वाढदिवस, साखरपुडा, मुंज आदि कार्यक्रमांसाठी व्यावसायिक दराने समाजमंदिरे दिली जात असल्याची तक्रार आहे. सवलतीच्या दरात नव्हे तर काही हजारात समाजमंदिरे उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यामुळे ज्यांनी ही समाजमंदिरे करारानुसार देण्यात आलेली आहेत. त्यांची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. दुसरीकडे ज्यांच्यासाठी समाजमंदिरांची संकल्पना पुढे आली होती तो मूळ हेतूच बाजूला सारला गेला असल्याचे दिसून येते. त्यामुळे याबाबत कारवाईची मागणी होत आहे.
समाजमंदिरांचा व्यावसायिक वापर
By admin | Updated: June 1, 2017 01:46 IST