नाशिक : शहर व परिसरात रंगाची उधळण करीत धुळवडीचा सण उत्साहात साजरा केला. यामध्ये उत्तर भारतीय नागरिकांचा सर्वाधिक समावेश होता. यावेळी लहान थोरांसह सारेच रंगांमध्ये रंगून गेले होते. होळीचा सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. शहरातील सातपूर, पाथर्डी फाटा परिसर, नाशिकरोड, देवळाली, पंचवटी या भागात उत्तर भारतीय नागरिकांची मोठी संख्या असल्याने सकाळी सहा वाजेपासून नागरिकांनी बाहेर पडून नातेवाईक तथा मित्रमंडळीला धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या. एकमेकांच्या घरी जात रंगमिश्रित पाण्याची उधळण करीत धुळवडीचा आनंदोत्सव साजरा केला. सकाळपासून धुळवड खेळण्याला उधाण आले होते. तसेच, एकमेकांना धुळवडीच्या शुभेच्छाही देत होते. यात लहान-मोठ्यांसह महिलाही उत्साहाने सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी गाणी म्हणत वाद्याच्या तालावर धुळवडीचा आनंद द्विगुणीत केला. सायंकाळी अनेक ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. स्थानिक नागरिकांनी धूलिवंदनालाच रंगाची उधळण करीत रंगपंचमी साजरी केली. दरम्यान, यावेळी शहरातील काही शाळांमध्येदेखील धुळवड साजरी केली असून, विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला होता. शहरातील जवळपास सर्वच भागांमध्ये उत्तर भारतीय नागरिकांची मोठी संख्या असल्याने गेल्या काही दिवसांपासून नाशिककरदेखील उत्तर भारतीय नागरिकांसोबत धुळवडीचा आनंद लुटताना बघावयास मिळतात. (प्रतिनिधी)
धुळवडीचा सण उत्साहात साजरा
By admin | Updated: March 7, 2015 01:31 IST