नाशिक : शहराची वाढती लोकसंख्या व गुन्हेगारीस आळा बसावा यासाठी नाशिकवासीयांची प्रमुख मागणी असलेल्या सीसीटीव्हीस शनिवारी (दि़१८) राज्याच्या अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली़ यामुळे शहरात बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्हीचा मार्ग मोकळा झाला आहे़ याबरोबरच पोलिसांच्या घरांसाठीही अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आल्याने पोलिसांच्या घरांचाही प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे़सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीवरील नियंत्रण व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी खासगी कंपनीकडून सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली होती़ तर सिंहस्थाच्या निमित्ताने कायमस्वरूपी सीसीटीव्हीसाठी खुद्द मुख्यमंत्रीही आग्रही होते़ मात्र, काही कारणास्तव कायमस्वरूपीचा प्रस्ताव बारगळला व तात्पुरत्या स्वरूपात ही यंत्रणा उभारण्यात आली़ यानंतर लोकप्रतिनिधी, आमदार व खासदार यांनीही शहरातील कायमस्वरूपी सीसीटीव्हीसाठी प्रयत्न सुरू केले होते़पोलीस प्रशासन, महापालिका यांनी शहराचे सर्वेक्षण करून ३१७ ठिकाणांवर एक हजार दोन सीसीटीव्ही बनविण्याचा आराखडा तयार करून तो शासनास पाठविला होता़ शहरातील सीसीटीव्हीसाठी आर्थिक तरतुदीची मागणी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे लावून धरली होती़ यानुसार शनिवारी (दि.१९) सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात कल्याण-डोंबिवली व नाशिक महापालिका हद्दीतील सीसीटीव्हीस मंजुरी देण्यात आली आहे़ यामुळे गत दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला सीसीटीव्हीचा मार्ग कायमस्वरूपी मोकळा झाला आहे़ (प्रतिनिधी)
अर्थसंकल्पात नाशकातील सीसीटीव्हीस मान्यता
By admin | Updated: March 19, 2017 00:40 IST