नाशिक : शहरातील उच्चभ्रूंची वसाहत मानल्या जाणाऱ्या कॉलेजरोडसारख्या वसाहतीला आता नव्याने वाहतुकीची उग्र समस्या जाणवू लागली असून, लगतच्याच गंगापूररोडवर अपघातात दोन महिला मृत्युमुखी पडल्याने ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. कोठे वाहनतळ नाही की कोणतीही शिस्त, वाहने कशीही हाका, ‘आपले कोण काय बिघडवते हे बघू’ ही मुजोर वृत्ती आणि त्याला पोषक व्यापारी संकुले या सर्वांमुळे आता कॉलेजरोडवासीयांचा जीव गुदमरू लागला आहे. त्यातून आता पुन्हा एकदा ‘कॉलेजरोड बचाव’ची हाक देण्याची वेळ आली आहे. सामान्यत: उच्चभ्रू वसाहत म्हटली की तेथे कोणत्या समस्या नसतातच असे गृहीत धरून त्याकडे ना शासकीय यंत्रणा लक्ष पुरवतात ना लोकप्रतिनिधी. कॉलेजरोडवरील वाहतुकीचा गुंता हा असाच वाढत चालला आहे. कॉलेजरोड, गंगापूररोड हे समांतर रस्ते. गंगापूररोडची समस्याही फार वेगळी नाही. वाढती व्यापारी संकुले आणि त्यामुळे निर्माण होणारा प्रश्न याबाबत आता शासकीय यंत्रणांनी काही तरी निर्णय घ्यावा, अशा मतापर्यंत स्थानिक नागरिक आले आहेत. कॉलेजरोड आणि गंगापूररोडवर भरधाव वेगाने मोटार हाकणारे रायडर्स, त्यातून होणारे अपघात ही एक समस्या, वाहतूक बेटांवर वाहनांचा गराडा ही दुसरी समस्या परिसरातील व्यापारी संकुलांमुळे रस्त्यातच उभी राहणारी वाहने ही तिसरी समस्या, तर कोणत्या तरी फुड प्लाझामध्ये किंवा टपरी छाप ठिकाणी एक कप चहा घेऊन सिगारेटचा धूर काढत तासन तास रस्त्याच्या कडेला उभी राहणारी तरुणाई, कॉलनी परिसरात मोटार सायकलवर प्रेमआलोचना करणाऱ्यांचे प्रणय चाळे आणि उशिरापर्यंत उभे असणारे टोळके, अशा असंख्य समस्या आहेत. त्यावर कोणी आणि कधी व्यक्त व्हावे, असे व्यासपीठ रहिवाशांना मिळतच नाही. निवडणुकीच्या वेळी गोड गोड बोलून मते मागणारे राजकीय पक्षांचे उमेदवार नंतर कोठे आणि कसे गायब होतात हे कळतही नाहीकॉलेजरोडवर राहणारेही नागरिकच आहेत आणि ते थेट तक्रारी करीत नसले तरी त्यांनाही समस्या भेडसावतात, असे होत नाही. मध्यंतरी म्हणजेच २००५ मध्ये काही स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन कॉलेजरोड बचाव समिती गठीत केली होती. या समितीने तत्कालीन मनपा आयुक्त विनिता सिंगल आणि पोलीस आयुक्त हिमांशु रॉय यांना निमंत्रित करून गाऱ्हाणे मांडले होते. त्यावेळी काही उपाययोजना करण्याचे आश्वासन मिळाले आणि काही प्रमाणात प्रयोगही झाले. परंतु त्यावेळी सर्व प्रश्न निकाली नाही. या शिवाय आता तर आणखी काही नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा कॉलेजरोड बचावची हाक देण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)(क्रमश:)
पुन्हा कॉलेजरोड वाचवण्यासाठी हाक
By admin | Updated: April 3, 2017 01:39 IST