नाशिक : सर्वांना शिक्षणाचा हक्क किंवा स्कूल चले हम अशा घोषणा आणि जाहिरातीचा वारंवार उल्लेख होत असला तरी समाजातील मागास व दुर्बल घटकात अशी हजारो मुले आहे की जी शिक्षणापासून अद्यापही वंचित आहेत. जिल्हा परिषदेने वीटभट्टीवरील अशाच ५६ मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. ही मुले आता शिक्षणात रमू लागली आहेत. मुंबई-आग्रा महामार्गालगत विल्होळी या छोट्याशा खेडेगावात वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणावर असून, मध्य प्रदेश व राज्यातील स्थलांतरित मोठ्या प्रमाणावर असून, येथे मध्य प्रदेश व राज्यातील स्थलांतरित मजुरांची मुले शाळेपासून वंचित असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे गटशिक्षणाधिकारी अनिल शहारे यांना मिळाली होती. त्यांनी वीटभट्टीवर भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या ठिकाणी असलेल्या अनेक मुलांनी शाळेचे तोंडही पाहिले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही मुले शाळेत जावीत यासाठी शहारे यांनी चाकं शिक्षणाची प्रकल्पाचे समन्वयक व शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांच्या समवेत चर्चा केली. जोशी यांनी हेमंत भांबरे यांना पाठवून पुन्हा सर्वेक्षण केले. तसेच जिल्हा परिषद शिक्षक साधना पवार यांनीही सर्वेक्षण केले असता ६ ते १४ वयोगटातील ५६ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळले. परंतु या मुलांना आपल्यापासून दूर पाठविण्यास वीटभट्टीवरील मजूर तयार नव्हते. त्यावर उपाय म्हणून चाकं शिक्षणाची या फिरत्या शाळेत मुलांना शिकविण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यानंतर जवळ असलेल्या स्वर्गीय गोपाळराव गुळवे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे संदीप गुळवे यांना विनंती करून वर्गखोली मिळविण्यात आली. आता ही मुले चाकं शिक्षणाची प्रकल्प गाडीतून शाळेत जातात. वास्तविक आता शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्यासाठी फक्त चार महिने बाकी आहेत; मात्र या कालावधीत मुले निदान वाचायला तरी शिकतील असा जोशी आणि जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. या कार्यासाठी केंद्रप्रमुख रणदिवे, विस्तार अधिकारी वंदना चव्हाण, मुख्याध्यापक गोसावी, महाले आदिंचे सहकार्य लाभत आहे.
वीटभट्टीवरील मुले रमली शाळेत
By admin | Updated: December 4, 2015 22:13 IST