सिडको : अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात पक्ष नावापुरताच उरलेल्या भाजपाने सिडको मतदारसंघातून पक्षाच्या आमदाराला निवडून आणून पक्ष संघटनेला उभारी दिली, परंतु याच सिडकोतून महापालिका निवडणुकीत शिवसेनेने चोवीसपैकी तब्बल पंधरा जागा खेचून घेतल्याने भाजपाला हा धक्का मानला जात असला तरी, भाजपानेही सात जागांची बिदागी मिळवून सेनेला चेकमेट दिला आहे. सिडको विभागाने आजवर संमिश्र राजकीय भूमिका घेतली आहे. कसमा व खान्देशवासीयांचे अधिक वास्तव्य असलेल्या सिडकोत एकेकाळी कॉँग्रेस व राष्ट्रवादीने बऱ्यापैकी बस्तान बसविले, त्यानंतर मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत सेना व भाजपानेही या विभागात आपले हातपाय पसरविले, त्याच पद्धतीने कामगार वर्गाच्या भरवशावर मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षानेही काही भागांत आपले बस्तान बसविले. अगदी महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सिडकोने नवख्या मनसेवर विश्वास टाकून सात जागा पदरात घातल्या. त्यामुळे मतदारांच्या अशा संमिश्र राजकीय भूमिका पाहता काल-परवा झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नेमके काय होईल? याचा ठोस अंदाज कोणी बांधू शकला नसला तरी, निवडणुकीपूर्वी होत असलेले पक्षांतर सोहळे पाहता सेना वरचढ ठरेल अशी व्यक्त होणारी शक्यता खरी ठरली आहे, परंतु विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या बाजूने उभे राहणारा मतदार महापालिका निवडणुकीत सेनेच्या जवळ जाईल काय? अशी व्यक्त होणारी शंकाही दुर्लक्षून चालणार नव्हती. भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्यासाठी ही निवडणूक तितकीच प्रतिष्ठेची व आगामी राजकीय भवितव्यासाठी महत्त्वाची होती, परंतु महापालिकेच्या तिकीट वाटपात त्यांच्या समर्थकांवरही अन्याय झाल्याने भाजपाला त्याचा फटका बसण्याचा अंदाज काही अंशी खरा ठरला आहे. एकमात्र खरे गेल्या पंचवार्षिकमध्ये एकही जागा न मिळालेल्या भाजपाने यंदाच्या निवडणुकीत सात जागांवर मिळविलेला विजय भाजपाचा उत्साह वाढविणारा तसेच सेनेला रोखण्यास पुरेसा आहे. या निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्ये म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भुईसपाट झाली आहे. भविष्यात या पक्षाला या भागातून गत वैभव प्राप्त करून घेण्यासाठी कठोर कष्ट घ्यावे लागणार आहे, तशीच काहीशी परिस्थिती मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचीदेखील झाली आहे. तानाजी जायभावे यांनी तीन वेळा सिडकोतून प्रतिनिधित्व केले, परंतु सेना - भाजपाच्या लाटेत त्यांचीही कमालीची पिछेहाट झाली आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीची परिस्थिती यापेक्षा वेगळी राहिली नाही. राजेंद्र महाले या राष्ट्रवादीच्या एकमेव उमेदवाराने विजय घेऊन पक्षाची इभ्रत वाचविली असली तरी हा विजय पक्षाचा नसून व्यक्तिगत महाले यांचा करिष्मा आहे हे मान्यच करावे लागेल. या शिवाय यंदाच्या निवडणुकीने भल्याभल्यांना अस्मान दाखविले हेदेखील वैशिष्ट्ये असून, दहा विद्यमान नगरसेवकांना पराभवाची चव चाखावी लागली, तर नऊ नगरसेवकांना त्यांच्या कार्यकर्तुत्वाने पुन्हा संधी मिळाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सेना व भाजपात आयाराम-गयारामांची रीघ लागली होती. त्याचा काही प्रमाणात फायदाही दोन्ही पक्षांना झाला, परंतु अशा आयाराम-गयारामांना उमेदवारी देऊन दोन्ही पक्षांनी स्वकीयांची नाराजीही ओढवून घेतली. त्यातूनच मनसेतून सेनेत गेलेले शीतल भामरे, अरविंद शेळके या नगरसेवकांना पराभूत व्हावे लागले. शिवाजी चुंभळे यांच्या पुतण्यालाही पराभवाची धूळ चाखावी लागली. या उलट बंटी तिदमे या सेनेच्या उमेदवाराने गेल्या निवडणुकीत शिवाजी चुंभळे यांच्याकडून झालेल्या निसटत्या पराभवाचा वचपा यंदा भरभरून मताधिक्य घेऊन काढला. किंबहुना मतदारांनी कैलास चुंभळे यांचा पराभव करून शिवाजी चुंभळे यांना धडा शिकविला, असे मानले तरी वावगे ठरणार नाही. या शिवाय पंधरा वर्षे नगरसेवक राहिलेले कॉँग्रेसचे लक्ष्मण जायभावे, माकपाचे तानाजी जायभावे, दहा वर्षे नगरसेवक राहिलेल्या अश्विनी बोरस्ते यांच्यासह विद्यमान नगरसेवक शोभा निकम, उत्तम दोंदे व शोभा फडोळ यांनाही पराभव पत्करावा लागला आहे. पंधरा जागा मिळविणाऱ्या सेनेची या मतदारसंघावर सारी भिस्त जशी असेल तसेच भाजपादेखील आपला हक्क सोडण्यास नकार देईल हे तितकेच खरे!
भाजपा आमदाराला सेनेचा झटका
By admin | Updated: February 25, 2017 01:10 IST