नाशिक : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान आणि द्राक्षमण्यांना जाणारे तडे यामुळे देशोधडीला लागत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नाशिक-नगर सीमेवर राहणाऱ्या एका युवा शेतकऱ्याने एक समर्थ पर्याय शोधला असून, त्यामुळे द्राक्ष शेतकऱ्यांचे नुकसान टळणार असल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे. सुनील घुमरे (हंडेवाडी) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. हवामान खात्याच्या अंदाजावरून त्या शेतकऱ्याने द्राक्षघड कसे वाचवावे हा प्रश्न पडला होता. द्राक्षघडांवर संरक्षणासाठी कसा कागद लावावा असा विचार करता करता त्यांना जेवणाच्या पत्रावळींचा प्रयोग करावा, असे सुचले. त्यांनी तो कागद पेपर मीलमधून खरेदी केला आणि द्राक्षांच्या प्रत्येक घडाला टोपीच्या आकाराने तो बसवला. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडण्याआधीच त्यांनी सव्वातीन एकर जागेवरील बागेत द्राक्षाच्या प्रत्येक घडाला तो कागद लावला. यासाठी त्यांनी सलग तीन दिवस मनुष्यबळाचा वापर करून घड वाचविले. त्यानंतर पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले असले तरी घुमरे यांच्या बागेतील द्राक्षे मात्र वाचली होती. सुमारे ७२० किलो कागद वापरून घुमरे यांनी सव्वातीन एकर जागेवरील द्राक्षबाग उद््ध्वस्त होण्यापासून वाचवली, यासाठी त्यांना ३२ हजार रुपयांचा कागद, मनुष्यबळासाठी १८ हजार रुपये, ३ हजार रुपयांची स्टेशनरी असा खर्च आला. यासाठी ४५ रुपये किलोप्रमाणे ७२० किलो कागद वापरला. चौकोनी कागद कापून त्याची टोपी प्रत्येक घडावर लावल्यास या घडांचे पावसापासून आणि पक्ष्यांपासूनही संरक्षण होत असल्याचे दिसून आल्याचे घुमरे सांगतात. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी याप्रकारची खबरदारी घेतल्यास त्यांचे नुकसान टळू शकेल, असेही ते सांगतात.
द्राक्षबाग वाचविण्यासाठी पत्रावळ्यांचा आधार अजब युक्ती
By admin | Updated: March 10, 2015 01:07 IST