कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आजपर्यंत या दीड वर्षात नाशिक शहर व परिसरातून तब्बल २४२ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्या पालकांकडून याप्रकरणी तक्रारी दाखल केल्या गेल्या. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली पोलिसांची ड्यूटी, तर दुसरीकडे बेपत्ता मुलींचा शोधदेखील ‘खाकी’कडून घेतला जात होता. आतापर्यंत २०० मुलींना शोधून त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात पोलिसांना यश आले आहे. चालूवर्षीही मुली बेपत्ता होण्याच्या घटना घडतच आहेत. आतापर्यंत ७९ मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे. त्यापैकी पोलिसांनी ५२ मुलींना शोधून पालकांच्या स्वाधीन केले आहे, तर उर्वरित २७ मुलींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
---आलेख---
अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना
वर्ष - बेपत्ता मुली- मिळून आलेल्या मुली
२०१८- १८२- -- १७२
२०१९- १९९- --- १९३
२०२०- १६३- --- १४८
२०२१ (मेअखेर) --- ०७९
-----मुली चुकतात कुठे ---
उदाहरण-१
अनेकदा अल्पवयीन मुलींना प्रेम आणि शारीरिक आकर्षण यांच्यामधील फरक लक्षात येत नाही. शहरातील एका चांगल्या वसाहतीमधील अशाचप्रकारे प्रेमवीराच्या आमिषाला भुलून अल्पवयीन मुलीने घर सोडले आणि त्याने दिलेल्या लग्नाच्या आमिषाला बळी पडल्याचे समोर आले. पोलिसांनी तिला अहमदनगर जिल्ह्यातील एका धार्मिक स्थळाहून ताब्यात घेतले.
--
उदाहरण-२
अल्पवयीन मुली घरातून निघाल्यानंतर सर्वप्रथम त्यांचा मोबाइल सोबत असलेल्या प्रियकराच्या सांगण्यावरून बंद करून टाकतात. असे पोलिसांच्या तपासातून वारंवार पुढे आले आहे. शहरातील एका मुलीनेही असेच केले. तिने आपले घर सोडले आणि प्रियकरासोबत थेट गोवा अन् पुढे नेपाळ गाठले. मुलीचा मोबाइल बंद येत असल्याने शोधकार्यात अडचणी निर्माण हाेत होत्या; मात्र महिला पोलीस अंमलदाराने प्रियकराच्या मोबाइल क्रमांकावर सातत्याने लक्ष ठेवत तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने त्यांचे ‘लोकेशन’ शोधून काढले. त्यांना विश्वासात घेत समजूत काढून दोघांना भारतात अर्थात नाशकात सुरक्षित आणले.
---
उदाहरण-३
शहरातील एका झोपडपट्टी भागातील मुलगी अशाच एका तरुणाच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली आणि तिने घरातून काढता पाय घेतला, तरुणासोबत दुसऱ्या शहरात राहू लागली. तरुणाने पांडवलेणी भागातील एका मंदिरात तिच्यासोबत बनावट लग्न केले आणि कालांतराने तिला पुन्हा तिच्या घरी सोडून दिले. हा सगळा प्रकार ती गर्भवती झाल्यानंतर उघडकीस आला. पोलिसांनी त्या संशयित तरुणावर कारवाईसुद्धा केली.
---इन्फो---
मुलामुलीचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र
मुलींचा वयोगट जर लक्षात घेतला तर पौगंडावस्थेतील आहे, हे समजून घ्यायला हवे. या वयात मानसशास्त्रातूनदेखील हे सिद्ध झाले आहे की, मन आणि शरीरात वेगाने बदल होत असतात म्हणूनच सोळावं वर्ष धोक्याचं असं म्हटलं जातं, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मृणाल भारद्वाज यांनी सांगितले.
घरात मैत्रीपूर्ण वातावरण नसते. मैत्री आणि प्रेम यांच्यात त्यांची गल्लत होते आणि अनोळखी व्यक्तीसुद्धा ओळखीची व आपलीशी वाटू लागते. समवयस्क मुला-मुलीचा प्रभाव या वयात अधिक होत असतो.
अनेकदा आर्थिक स्तर जर कमकुवत असला तरीदेखील अल्पवयीन मुली मौजमजा, चंगळवादाच्या आमिषाला भुलूनसुद्धा घरातून पळून जाण्याचे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे आई, वडिलांपैकी कोणीतरी मुलामुलींचा मित्र म्हणून भूमिका बजवायला हवी, असा सल्लाही भारद्वाज यांनी दिला.
270721\27nsk_25_27072021_13.jpg~270721\27nsk_26_27072021_13.jpg~270721\27nsk_27_27072021_13.jpg
अल्पवयीन मुली पळून जातात~अल्पवयीन मुली पळून जातात~अल्पवयीन मुली पळून जातात