नाशिक : मिळकत कराची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मोबाइल कंपन्यांना महापालिकेने दणका दिला असून, दोन दिवसांत तब्बल २७ मोबाइल टॉवरवर जप्तीची कारवाई करत सील ठोकले आहे. त्यात जीटीएल कंपनीचे ९, एअरसेलचे ५ तर एटीसी कंपनीच्या १३ टॉवर्सचा समावेश आहे.महापालिकेने राज्य शासनाच्या निर्देशानुसार शहरात मिळकत कराच्या थकबाकीदारांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यासाठी महापालिकेने १८ वसुली पथके कार्यान्वित केली आहेत. याशिवाय, सहाही विभागात ढोल पथक लावून थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. महापालिकेमार्फत शहरातील मोबाइल कंपन्यांच्याही टॉवर्सवर जप्ती कारवाईचा इशारा देण्यात आला होता. महापालिकेने त्यासंदर्भात संबंधित कंपन्यांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यातील काही कंपन्यांनी महापालिकेकडे लेखी हमी देत थकबाकीचा भरणा करण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु नोटिसा बजावूनही काही कंपन्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे महापालिकेने गेल्या दोन दिवसांत सहाही विभागात थकबाकीदार कंपन्यांचे मोबाइल टॉवर्स सील करण्याची कारवाई केली. त्यात सर्वाधिक १३ टॉवर्स हे एटीसी कंपन्यांचे असून, त्याखालोखाल ९ जीटीएल कंपनीचे आहेत. महापालिकेने सातपूर विभागात जीटीएल कंपनीचे ३, सिडको विभागात जीटीएलचा एक आणि एटीसी कंपनीचे २, पंचवटी विभागात जीटीएलचा एक, नाशिकरोड विभागात जीटीएलचा एक तर एअरसेलचे ३ आणि एटीसीचे ८ टॉवरला सील ठोकले.
२७ मोबाइल टॉवर सील
By admin | Updated: March 19, 2017 01:01 IST