पंचवटी : तपोवनातील साधुग्रामच्या आरक्षित जागेवर अनधिकृतपणे थाटलेल्या जवळपास १५० झोपड्यांचे अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाकडून मंगळवारी भल्यासकाळी जमीनदोस्त करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टीधारकांनी मनपाच्या जागेवर या झोपड्या थाटल्या होत्या. सकाळी अतिक्रमणविरोधी पथकाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केल्याने अनेक भटक्या कुटुंबांना पर्यायी जागेचा शोध घ्यावा लागणार आहे.अतिक्रमणे हटविण्यापूर्वी संबंधितांना नोटिसा व सूचना दिल्याने काही नागरिकांनी स्वत:हून, तर काहींच्या झोपड्या पथकाने हटविल्या. या कारवाईदरम्यान अल्पसा विरोध झाल्याने मनपाची ही अतिक्रमण मोहीम शांततेत पार पडली. तपोवनात साधुग्रामसाठी शासनाने भूखंड आरक्षित केला असून, या जागेवर गेल्यावेळेचा सिंहस्थ कुंभमेळा आटोपल्यानंतर काही वर्षांनी काही झोपडीधारकांनी अतिक्रमण केले होते. त्यानंतर प्रशासनाकडून एक ते दोन वेळा ही अतिक्रमणे काढण्यात आली होती; मात्र झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविल्याने त्यावेळी प्रशासनाची अडचण झाली होती. आगामी सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपल्याने तसेच सिंहस्थाची कामे सुरू झाल्याने साधुग्रामच्या आरक्षित जागेवरील अतिक्रमण हटविल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. उंटवाले, हत्तीवाले, मोलमजुर तसेच केटरिंगचे काम करणाऱ्या जवळपास शेकडो नागरिकांनी मनपाच्या भूखंडावर अतिक्रमण केलेले होते. प्रशासनाने भल्या सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. सूचना दिलेली असल्याने किरकोळ विरोध झाला. अतिक्रमणे हटविताच प्रशासनाकडून सदरच्या जागेचे सपाटीकरणाचे काम करण्यात आले. तब्बल चार तास चाललेल्या या मोहिमेसाठी मनपाचे अतिक्र मण विभागाचे उपआयुक्त आर. एम. बहिरम, पंचवटी विभागीय अधिकारी ए. पी. वाघ, जयश्री सोनवणे, मालिनी शिरसाठ आदिंसह सहा विभागांचे विभागीय अधिकारी, नगररचना व बांधकाम विभागाचे कर्मचारी, चार जेसीबी यंत्र, शंभर कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाचे चार पोलीस निरीक्षक, आठ पोलीस उपनिरीक्षक व ८६ कर्मचारी असे बळ तैनात करण्यात आले होते. (वार्ताहर)
१५० झोपड्यांचे अतिक्रमण जमीनदोस्त
By admin | Updated: November 19, 2014 01:19 IST