नंदुरबार : येथील स्थानकावर सुरू करण्यात आलेल्या रेल्वे आयसोलेशन कोचमध्ये मिळणाऱ्या सुविधा लक्षात घेता कोरोना रुग्णांमध्ये समाधान आहे. सद्यस्थितीत येथे ५४ कोरोना रुग्ण आयसोलेशनसाठी दाखल करण्यात आले असून सहा डॅाक्टर व १७ कर्मचारी येथे कार्यरत आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता रेल्वे विभागाने या ठिकाणी आयसोलेशनसाठी रेल्वे पाठविली आहे. गेल्या आठवड्यापासून या रेल्वेत आयसोलेशन कोच कार्यान्वित करण्यात आले आहेत. एकूण १२ कोचच्या या रेल्वेत दोन कोच हे डाॅक्टर्स व कर्मचारी यांच्यासाठी राखीव आहेत तर दहा कोचमध्ये रुग्णांसाठी सोय करण्यात आली आहे. संपूर्ण पुरुषांसाठी असलेल्या या आयसोलेशन कोचमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत. त्यात कुलर्स, ऑक्सिजन सिलिंडर, पिण्याचे पाणी, पंखे तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा आहेत. दोन वेळा रुग्णांची तपासणी करण्यात येते. शिवाय रुग्णांना फुप्फुसाच्या व्याधीसाठी फिजिओथेरपीचादेखील उपचार केला जात आहे.
युनानी डाॅक्टरांकडून होताहेत उपचार...
रेल्वे आयसोलेशन कक्षातील रुग्णांवर अक्कलकुवा येथील युनानी मेडिकल काॅलेजमधील डॅाक्टर हे उपचार करीत आहेत. सहा डॅाक्टरांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी वेगळा कोच राखीव ठेवण्यात आला आहे. याशिवाय सहा परिचारिकादेखील कार्यरत आहेत. चार आरोग्य सेवक येथे असून सात सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
n जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. नितीन बोडके, नोडल अधिकारी डाॅ. अभिजित गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली या कोचचे व्यवस्थापन हे चेतन सोंजे व योगेश नाईक हे काम पाहत आहेत.