लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नतील अभियानांतर्गत जिल्ह्यात काम करणारे ८८ कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. उमेदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राज्यातील तीन हजार कंत्राटी कर्मचा-यांना नव्याने सेवा आदेश देवू नयेत असे आदेश काढले आहेत. या आदेशांचे विरोध करण्यासाठी कर्मचारी राज्यभर बेमुदत संप करत आहेत. यांतर्गत जिल्ह्यात बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. महिला सक्षमीकरण गरीबी निर्मुलनासोबत शिक्षण, आरोग्य, पोषण, उपजिविका यावर आधारित व्यवसाय निर्मिती, पंचायत राज संस्थेत सहभागी आरएसईटीआय व डीडीयूजीकेवाययांतर्गत रोजगारभिमुख व्यवसाय प्रशिक्षणे राबवत जीवनोन्नती अभियानाची वाटचाल सुरू आहे. हे सर्व सुरू असतानाच राज्य स्तरावर सप्टेंबर २०२० मध्ये प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण जैन यांनी ज्या कंत्राटी कर्मचा-यांचे सेवा आदेश संपुष्टात आले आहेत. त्यांना सेवा आदेश देवू नयेत तसेच सीएससी या बाह्यस्थ संस्थेकडे अभियान सोपवण्यात आले आहे. या संस्थेकडे अभियान जावू नये तसेच अभियान केंद्र शासनाच्या मार्गदर्शिकेप्रमाणे पूर्ववत सुरू ठेवावे यासाठी राज्यातील ३ हजार कंत्राटी कर्मचारी सध्या संपावर आहेत. राज्य कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी मंडळाने ही संपाची हाक दिली आहे. एमएसआरएलएमकडून या सर्व गोंधळात ऑगस्ट महिन्यापासून कर्मचा-यांचे वेतन थकवण्यात आले आहे. तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहेे. हे वेतन देण्यासह सेवाआदेश द्यावेत यामागणीसाठी जिल्ह्यात आंदोलन सुरू असून आंदोलनात यशवंत ठाकूर, उमेश अहिरराव, संतोष पगारे, अजय जाधव, नाना पावरा, सचिन बोरसे, योगेश पाटील, निलेश वसावे, अशोक साळवे, मीनाक्षी वळवी, अलका पाडवी, कविता एडगे, पिंकी वळवी यांच्यासह कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नसल्याने कर्मचारी हात भोगत आहेत. दिवाळीसारखा सण असतानाही एमएसआलएमकडून वेतन दिले जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
उमेदचे ८८ कर्मचारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:00 IST