मनोज शेलार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाची साथ कमी झाली असली तरी गाफील राहून चालणार नाही. दिवाळीच्या काळात नातेवाईकांकडे जाणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. दुसऱ्या लाटेची चर्चा आहे. त्या दृष्टीने आवश्यक तयारी आहेच. नाॉन कोविड रुग्णांसाठी देखील आवश्यक त्या उपाययोजना जिल्हा रुग्णालयात करण्यात आल्या आहेत. डायलिसीस युनिटची संख्या आता १२ झाली आहे. नवीन पाच युनिट रविवारपासून कार्यान्वीत होत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.के.डी.सातपुते यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. रुग्णसंख्या कमी झाली कोविड उपचार कक्षही बंद करणार का? कोरोनाला अटकाव आणण्यासाठी प्रशानाने विविध उपाययोजना राबविल्या. त्यामुळे जिल्ह्यात कोविड पहिल्यापासून नियंत्रीत होता. आता रुग्ण संख्या कमालीची घटली आहे. असे असले तरी जिल्हा रुग्णालयाती उपचार कक्ष आणि तालुका स्तरावरील कक्ष सुरू ठेवण्यात येतील. नंदुरबारातील एकलव्य रेसीडेन्शीयल स्कूलमधील कक्ष बंद करण्यात आला आहे. शहादा व तळोदा येथे काही रुग्ण उपचार घेत आहेत. काही खाजगी उपचार कक्ष देखील सुरू आहेत.दुसऱ्या लाटेची शक्यता आहे का? याबाबत विविध चर्चा आहेत. लाट येवो किंना ना येवो, प्रत्येकाने मात्र काळजी घेतली पाहिजे. कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. आता दिवाळीच्या काळात एकमेकांच्या घरी जाणे, पर्यटनस्थळी जाणे असे प्रकार वाढू शकतात. त्यातून कोरोनाचे संक्रमण वाढू शकते. त्यामुळे लहान मुले, वृद्ध यांनी बाहेर जाणे अजूनही टाळावे. मास्क, सॅनिटायझर यांचा वापर कायम ठेवावा, सुरक्षीत अंतर पाळावे. लक्षणे दिसून येत असल्यास लागलीच स्वॅब चाचणी करावी.
डायलिसीस युनिट वाढविले...जिल्हा रुग्णालयातील डायलिसीस युनिटची संख्या वाढविण्यात आली आहे. पूर्वी सात होते आता नव्याने पाच वाढले आहेत. त्यामुळे डायलिसीस रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. या युनिटचे उद्घाटन सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय तीन कक्षात मोठ्या क्षमतेचे जनरेटर देखील बसविण्यात येत आहेत. त्यामुळे मोठी सोय होणार आहे.
ऑक्सीजनमध्ये स्वयंपुर्ण...जिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन प्लॅन्ट पुर्ण झाला आहे. या ठिकाणी सर्व अत्याधुनिक मशिनरींच्या वापर करण्यात येत आहे. त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना लागणारा ऑक्सीजनची समस्या मिटणार आहे.